तब्बल ३८८१ जणांना वैद्यकीय मदत व आयसीयू सेवेचा ९८ जणांना लाभ
पुणे : जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात लाखो भाविक येतात. त्यांना ऐन गर्दीत उद्भविणा-या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याकरिता जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आरोग्य तपासणी केंद्र, १० ठिकाणी मोफत रुग्णवाहिका सेवा आणि व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची सुविधा २४ तास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ३ हजार ८८१ जणांना वैद्यकीय मदत व ९८ जणांना आयसीयू सेवेचा लाभ झाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र गणपती मंदिर परिसरात आहे. यामध्ये भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, ससून सर्वोपचार रुग्णालय, संचेती हॉस्पिटल, सिंबायोसीस हॉस्पिटल, सद्गुरु शंकर महाराज मठ वैद्यकीय समिती यांचा सहभाग आहे. याशिवाय विविध गणेश मंडळाच्या उत्सवमंडपात आरोग्यविषयक तपासणी शिबीरे देखील ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केली जात आहेत.
शहराच्या मध्यभागामध्ये अचानक रुग्णवाहिकेची गरज भासल्यास ट्रस्टच्या रुग्णवाहिका विविध १० ठिकाणी सज्ज आहेत. तर, एन.एम.वाडीया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन येथे मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा विनामूल्य मिळत आहे. तर, ट्रस्टच्या सर्व रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येत असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.
गणपती मंदिराशेजारी आयसीयू विभागाची मोफत सुविधा
गर्दीच्या वेळी श्वसनाला त्रास होणे, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब, चक्कर येणे यांसह अनेक अत्यावश्यक व तातडीच्या समस्या उदभवतात. त्यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे, पुणे मनपा आरोग्य विभाग च्या सहयोगाने मोफत आयसीयू सेवा उपलब्ध करुन दिले जात आहे. गणपती मंदिराशेजारील विभागात ३ आयसीयू बेड, १ व्हेंटिलेटर व १ ईसीजी मशिन आणि रुग्णवाहिका सेवा दिली आहे. याचा लाभ आजपर्यंत ९८ जणांनी घेतला आहे.