एनपीएस वात्सल्य योजनेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल-पुणे जिल्हा परिषद सीईओ संतोष पाटील
पुणे, :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे येथे करण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समिती संयोजक चित्रा दातार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक जावेद मोहनवी, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक जोशी पुथूर तसेच कॅनरा बँकच्या उपमहाव्यवस्थापक लीना पिंटो, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील म्हात्रे पुल परिसरातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात पुणे येथे करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पपेट शो तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. यादरम्यान, उपस्थितांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले संबोधनही लक्षपूर्वक ऐकत योजनेची माहिती घेतली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली होती. वात्सल्य याचा अर्थच मूळात माया आणि ममता असून त्याचे प्रतिबिंब या योजनेत दिसून येते.
ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी केवळ पेन्शन या कारणासाठी शासकीय नोकरीस प्राधान्य दिले जायचे. नंतरच्या काळात एनपीएसच्या स्वरुपात पेन्शनची संधी खासगी नोकरदारांनाही उपलब्ध करून देण्यात आली. आता अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली असून या योजनेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल, याचा विश्वास वाटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक चित्रा दातार यांनी उपस्थितांना योजनेविषयी सविस्तर माहिती देत अधिकाधिक संख्येने यामध्ये मुलांची खाती उघडण्यासाठी आवाहन केले.
एनपीएस वात्सल्य योजनेविषयी-
एनपीएस वात्सल्य ही ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान एक हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करु शकतो. मुलाच्या १८ वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे.
मुलगा १८ वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते १८ या वयोगटात उघडण्याची ही योजना असून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.