31 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
Homeमहाराष्ट्रमंदिर समितीच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी!

मंदिर समितीच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी!

पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास होण्या-या अतिरिक्त खर्चास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

 आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची सेवा मंजुर आकृतीबंधानुसार माहे जानेवारी, 2019 पासून संरक्षित केली आहे. तसेच माहे जून, 2019 पासून सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी लागू केली आहे. मात्र, आस्थापनेवरील खर्चास 10% ची मर्यादा असल्याने 50%, 75% व 100% महागाई भत्ता व 5% घरभाडे भत्ता देण्यात येत होता. तथापि, मंदिर समितीने सन 2022–2023 या आर्थिक वर्षापासून आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना 203% महागाई भत्ता व 10% घरभाडे भत्ता लागू केला आहे. मात्र, दि.03/01/2019 ते दि.31/03/2024 या कालावधीतील महागाई व घरभाडे भत्त्याच्या फरक दिलेला नव्हता. तसेच शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते देण्याबाबत कर्मचा-यांकडून वारंवार मागणी होत होती.
 आषाढी एकादशी दिवशी म्हणजे दिनांक 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला आले होते. त्यावेळी आस्थापनेवरील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग मिळणेबाबत चर्चा करून विनंती केली होती. त्यावर त्यांनी प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा, शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासित केले होते. त्यानुसार मंदिर समितीच्या सभेत निर्णय घेऊन धर्मादाय आयुक्त यांच्या मंजुरीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तद्नंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दि.20 सप्टेंबर रोजी मंत्रालय येथे व दि.21 सप्टेंबर रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. त्यास दि. 30 सप्टेंबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे.
मंदिर समितीच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत विविध संवर्गातील 225 कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचा-यांना सध्या सहावा वेतन आयोग लागू आहे. आता शासनाच्या मंजुरीने 7 वा वेतन आयोग लागू होऊन प्रतिमहा 7 ते 10 हजार इतकी भरघोस वेतनवाढ होणार आहे. त्यासाठी मंदिर समितीचा प्रतिवर्षी एक ते दिड कोटी इतका अतिरिक्त खर्च वाढणार आहे. याशिवाय, दि.03/01/2019 ते दि.31/03/2024 या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगातील भत्त्याच्या फरकाची रक्कम देखील कर्मचा-यांना मिळणार आहे. याबाबत कर्मचा-यांकडून आनंद व्यक्त होत आहे. या कर्मचा-यांच्या सेवा 10 ते 30 वर्षे झालेल्या आहेत असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
 समिती कर्मचा-यामार्फत श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील 36 परिवार देवता, तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे यांचे व्यवस्थापन करण्यात येते. यासर्व देवदेवतांची पुजा-अर्चा, नित्योपचार, नैमत्तिक उपचार तसेच वर्षातील 4 उत्सव नियमितपणे पार पाडण्याची जबाबदारी कर्मचा-यांवर आहे. तसेच दर्शनरांग व्यवस्था, अन्नछत्र, गोशाळा, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, चप्पलस्टँड, मोबाईल लॉकर, सुरक्षा व इतर अनुषंगीक अशा विविध प्रकारच्या पुरेसा सोई सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे कर्मचारी सेवाभावाने व वेळेचे बंधन न ठेवता उपरोक्त कामे करीत असतात. सदर कर्मचा-यांची सेवा संरक्षित होऊन देखील कमी वेतन मिळत असल्यामुळे व वाढत्या महागाईमुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत होते. मंदिर समितीने आस्थापनेवरील कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र, सेवा शर्ती लागू करणे, अनुकंपा नियमावली, कर्तव्य सुची निश्चित करून देणे, विमा पॉलीसी अशा प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

सदर प्रस्ताव मंजुरीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय व मंत्रालय स्तरावर मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री व आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची सन 2019 मध्ये सेवा संरक्षित करून मागील वर्षी सहावा वेतन आयोग व यावर्षी मागील फरकासह सातवा वेतन आयोग मंदिर समितीने लागू केल्याबद्दल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य व अधिकारी तसेच विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शासनाचे मनःपूर्वक आभार…..!

विनोद पाटील, अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची संघटना पंढरपूर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31 ° C
31 °
31 °
25 %
3.2kmh
0 %
Sat
31 °
Sun
32 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!