पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टिकोनातून व शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे याकरिता विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग तर्फे ताडीवाला रस्त्यावरील भारतीय रेल्वे खेळाचे मैदान येथे शस्त्रपूजन उत्सव पार पडला.यावेळी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक केदार गोखले, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख दीपक विसपुते, भाग संघचालक विधीज्ञ प्रशांत यादव व्यासपीठावर उपस्थित होते. उत्सवात स्वयंसेवकांनी विविध शारीरिक व बौद्धिक प्रात्यक्षिके सादर केली.
केदार गोखले म्हणाले, काळानुरूप शस्त्रांचे स्वरूप बदलत गेले. आता विध्वंसक शस्त्रे असतात तशी मनुष्याचे जीवन उज्वल करणारे शस्त्र म्हणजे व्हॅक्सिन. व्हॅक्सिन च्या रुपाने मानवी शरीराला शस्त्र मिळते. तसेच अणूशक्तीचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शब्द हीच शस्त्रे ठरली. जसे ‘वन्दे मातरम्’ या शब्दाने संपूर्ण देश भारावला आणि शब्द शस्त्र ठरले. शक्ती हे स्त्री रुप आहे; आपण महिलांचाही सन्मान केला पाहिजे. स्त्रीचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरुणांना पालकांनी असे संस्कार द्यावे. संघ बाल-तरुणांना अशा प्रकारचे संस्कार देतो व भविष्यातही राष्ट्र रक्षणाप्रमाणे स्त्री रक्षणाचे संस्कार संघ देत राहील.
दिपक विसपुते म्हणाले, दिनांक २७ सप्टेंबर१९२५ रोजी संघाची स्थापना डाॅ. हेडगेवार यांनी केली. त्याचे आता विशाल स्वरुप झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यालाही ७५ वर्षे झाली आहेत. पंच्याहत्तर वर्षांत आपली ओळख एक मजबूत राष्ट्र अशी झाली आहे. आता जग भारताकडे आदराने बघत आहे. जसे भारताने जगाला व्हॅक्सिन दिले. अन्न-गहू कोरोना काळात भारताने जगाला दिले. संघाचा इतिहास सुद्धा असाच विकासाचा आहे. देशातील लोकांच्या मनात संघ देशभक्तीचे जागरण गेली शंभर वर्षे करीत आहे. संघाच्या चार पिढ्या या कामात समर्पित झाल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, संघाच्या शाखा हीच संघाची शक्ती आहे. संघ कामाची स्विकार्हता समाजात वाढली. समाजाच्या एकाकी पणाची भावना संघाने दूर केली. भारतीय समाज स्वत:च्या भारतीय विचारांवर उभा रहावा, यासाठी संघाने कार्य केले. शंभर वर्षांत समाज कसा असावा याचे प्रारुप संघाने उभे केले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणपूरक जीवन, नागरिक शिष्टाचार, स्वदेशी आधारित जीवनशैली या पाच गोष्टींचे आचरण व प्रचार करावा असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
याप्रसंगी प्रसंगी प्रांत शारीरिक प्रमुख निलेश भंडारी, महानगर सहकार्यवाह मंगेश घाटपांडे उपस्थित होते. सर्व प्रथम प्रशांत यादव यांनी आभार मानले. तर कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांनी मान्यवरांचा परिचय करुन देत प्रास्ताविक केले.