पुणे, : मेंदुज्वर (मेनिंजायटीस) हा एक गंभीर आजार असून तो लसीकरणाने टाळता येतो. विशेष: हा आजार बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक मेंदुज्वर दिवस साजरा करण्यात येतो. या आजारावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणे, या आजाराचे लवकर निदान आणि लसीकरणाद्वारे त्यावर प्रतिबंध करून संबंधित रुग्णाला नवे आयुष्य देण्याच्या क्षमतेला चालना देणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे.
मेंदुज्वर हा आजार आरोग्यावरील गंभीर संकट असून, जागतिक स्तरावर दरवर्षी २.५ दशलक्षहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आणि यातील विशेष गंभीर बाब म्हणजे या आजाराला बळी पडलेल्यांमध्ये पाच वर्षाखालील सुमारे ७० टक्के मुलांचा समावेश आहे. मेंदुज्वरामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती (मेनिंजेस) असलेल्या अस्तराला सूज येते, जी सामान्यतः जिवाणू, बुरशीजन्य किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होते.
मेंदुज्वर असलेल्या रुग्णांमधील चिकित्साविषयक वैशिष्ट्ये ही कारण, रोगाचा कालावधी (अल्पकालिक, उप-अल्पकालिक किंवा दीर्घकालिक), मेंदूचा सहभाग (मेनिंगो-एन्सेफलायटीस) आणि प्रणालीगत गुंतागुंत (उदा. सेप्सिस) यावर अवलंबून असतात. मान कडक होणे, ताप, गोंधळ किंवा मानसिक स्थितीत बदल, डोकेदुखी, मळमळ, उलट्या ही मेंदुज्वराची सामान्य लक्षणे आहेत. फेफरे येणे, कोमा, चेतासंस्थाशास्त्रीय (न्यूरोलॉजिकल) तूट (जसे की – ऐकण्याची क्षमता कमी होणे, दृष्टी कमी होणे, अपंगत्व, अंगात अशक्तपणा येेणे) ही मेंदुज्वरची वारंवार दिसणारी लक्षणे आहेत.
मेंदुज्वरामुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या आघाडीच्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होतो. तीव्र जिवाणूजन्य मेंदुज्वर होण्याच्या तीन प्रमुख कारणांपैकी ‘निसेरिया’ मेंदुज्वर हा उपचार असूनही १५ टक्क्यांपर्यंत आणि उपचाराशिवाय ५० टक्क्यांपर्यंत उच्च मृत्युदरासाठी जबाबदार आहे. विविध अभ्यासांतून दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय मुलांमध्ये निसेरिया मेंदुज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ दर्शवण्यात आली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘क्लाउडनाईन’ रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ सल्लागार आणि नवजात रोग विशेषज्ञ (निओनॅटोलॉजिस्ट) डॉ. अमित निगडे यावर भर देताना सांगतात की, ‘मेंदुज्वरामुळे होणारे चेतासंस्थीय (न्यूरोलॉजिकल) नुकसान अनेकदा भरून न येणारे असते. लहान मुले आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी लसीकरण आवश्यक ठरते. लसीकरण केवळ संसर्ग टाळत नाही तर दीर्घकालीन नुकसान होण्याआधी हा आजार रोखून जीवदान देते. आमच्या सर्वात असुरक्षित लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.’
मेंदुज्वरासारख्या प्राणघातक आजाराचा सामना करण्यासाठी ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ने (आयएपी) ‘मेनिन्गोकोकल’ लशीची शिफारस केली आहे. या लशीचे दोन डोस देणे आवश्यक असून, त्यातील ९ ते २३ महिन्यांदरम्यान दोन डोस आणि दोन वर्षांच्या पुढे ज्यांना या रोगाचा धोका जास्त असेल, अशांसाठी एकच डोस देेण्याची शिफारस आहे. जर एखादे मूल ९ महिने किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास, त्यांना आक्रमक असलेल्या मेनिन्गोकोकल रोगाविरूद्ध लस मिळाल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३० पर्यंत जीवाणूजन्य मेंदुज्वराच्या साथीचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने एक रोडमॅप सादर केला आहे, ज्यामध्ये लस-प्रतिबंधित प्रकरणे ५० टक्के आणि मृत्यू ७० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. आपण जागतिक मेंदुज्वर दिन साजरा करत असताना, आपल्या मुलांचे आणि समुदायांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होऊ या. आज सक्रिय पावले उचलल्याने उद्याचे जीवन वाचू शकते, सर्वांसाठी एक निरोगी भविष्य सुनिश्चित होऊ शकते.