17.1 C
New Delhi
Thursday, December 5, 2024
Homeमनोरंजननववर्षारंभात धमाल 'मु. पो. बोंबीलवाडी' खळखळून हसवणार

नववर्षारंभात धमाल ‘मु. पो. बोंबीलवाडी’ खळखळून हसवणार

१ जानेवारीला होणार प्रदर्शित

परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटात प्रशांत दामले ‘हिटलर’, आनंद इंगळे ‘चर्चिल’च्या भूमिकेत; १ जानेवारीला होणार प्रदर्शित वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकरही महत्वाच्या भूमिकांमध्ये

पुणे : विवेक फिल्म्स, मयसभा करमणूक मंडळीकृत परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी व दिलीप शितोळे निर्मित ‘मु. पो. बोंबीलवाडी’ नव्या वर्षात धमाल करणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच आला असून, १ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे, याची खुणगाठ या टीझरमुळे पक्की होते.

पुण्यातील पत्रकार भवनात सोमवारी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटाविषयी संवाद साधत मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, सुनील अभ्यंकर, अद्वैत दादरकर, मनमित पेम, अभिनेत्री रितिका श्रोत्री आदी उपस्थित होते.

हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर येणारा लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांचा हा चित्रपट आहे. मोकाशी यांची विनोदाची पठडी आणि त्यांच्या ‘मु. पो. बोंबीलवाडी’ नावाच्याच नाटकावर बेतलेल्या या चित्रपटाकडून रसिकांच्या आशा खूप उंचावल्या आहेत. त्यातच चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्यानेही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

टीझरमध्ये अनेक गमतीशीर प्रसंग समोर येतात. हिटलरच्या भूमिकेतील प्रशांत दामले आणि इतरांच्या तोंडी धमाल संवाद आहेत आणि त्याची झलक या टीझरमध्ये दिसते. सांकेतिक भाषेत बोलतना हिटलर म्हणतो, “हाताशी…, तोंडाशी…, गळ्याशी…?” त्यावर समोरून प्रतिसाद येतो, “ओके ओके…, पाळे बोके…, खोक्यार खोके, बॉडीवर डोके…!”. हिटलर त्यावर म्हणतो, “हांजी, हांजी…नाझी!”

इतरही पात्रांचे युद्ध, बॉम्ब यांसंबंधीचे अनेक मजेशीर संवाद समोर येतात. चित्रपट कोणत्या पठडीतील आहे, त्यावर त्यातून प्रकाश पडतो. परेश मोकाशी यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांप्रमाणेच ‘मु. पो. बोंबीलवाडी’सुद्धा वेगळे आणि धमाल मनोरंजन देणार, याविषयीची खात्री त्यातून पटते.

प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या, तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्सचे भरत शितोळे आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ‘मु. पो. बोंबीलवाडी’बद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली होती. आधी ‘कोण होणार हिटलर?’ ही उत्सुकता होती आणि त्याचे उत्तर मिळाल्यावर ती अधिक वाढत गेली. त्यानंतर चित्रपटाचे प्रमोशनल साँग अर्थात प्रसारगीत प्रदर्शित झाले आणि या ‘कॉपीराइट फ्री’ गाण्याने धमाल उडवून दिली. परेश मोकाशी यांनी लिहिलेले हे गाणे तन्मय भिडे या २२ वर्षीय संगीतकाराने संगीतबद्ध केले असून, अवधूत गुप्ते आणि वैभव मांगले यांनी ते गायले आहे.

त्याआधी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यावरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात ती पडद्यावर कशी साकारली गेली असेल, याबद्दल रसिकांना कुतूहल आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे, असे परेश मोकाशी म्हणाले.

या चित्रपटाबद्दल बोलताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे एक लाफ्टर राईड आहे. प्रशांत दामले यात हिटलर करत असल्याने चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. कलाकारांची एक उत्तम भट्टी चित्रपटात जमून आली असून, आजच्या टीझरमध्ये त्याची एक झलक दिसून येते.”

प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, “हा प्रश्न मला खरेतर खऱ्या हिटलरला विचारावासा वाटतो, की ‘काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वगायाला जमेल का आयुष्यात?”

हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. “आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो… गमतीचा भाग सोडला तर, चित्रपट उत्तम झाला आहे. कलाकारांची इतर तंत्रज्ञांची उत्तम साथ मिळाल्याने भट्टी चांगलीच जमून आली आहे. आजच्या टीझरनंतर प्रेक्षक चातकासारखी चित्रपटाची वाट पाहतील याची मला खात्री आहे.”

चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे भरत शितोळे म्हणाले, “फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो आणि ठरवले की मराठी व हिंदी चित्रपट करायचे. पण नेमका कोणता चित्रपट करायचा वगैरे विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा विषय सांगितला आणि आम्ही लगेच हो म्हटले. चित्रपटाच्या घोषणेपासूनच आम्हाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.”

——————-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
51 %
2.1kmh
0 %
Wed
21 °
Thu
25 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!