- पुणे – : पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबाग तसेच शिवाजी रस्ता परिसरात नागरिकांची कायम वर्दळ असते. याच परिसरात असणाऱ्या बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला बेकायदेशीरपणे मुख्यबाजारपेठेच्या भागामध्ये येऊन थांबत असल्याची तक्रार स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला गेली काही दिवसांपासून तुळशीबाग, मंडई तसेच मुख्य शिवाजी रस्त्यावर उभे राहत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे परिसरामध्ये राहणारे रहिवाशी विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे आपली वस्ती सोडून नागरी भागामध्ये येणाऱ्यांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी रासने यांनी मांडली.
सदाशिव, शनिवार तसेच नारायण पेठेत मोठ्या संख्येने अभ्यासिका असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे राज्यभरातील विद्यार्थी येथे आहेत. परीक्षांचे निकाल, वाढदिवस तसेच इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत असल्याची तक्रार येत असल्याचं देखील आमदार रासने यांनी यावेळी सांगितल आहे. परिसरात शांतता राहण्यासाठी पोलिसांनी योग्य ती समज संबंधितांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.