पिंपरी- कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाची सुरुवात रिद्धी पोतदार यांचे भरतनाट्यम, पं. अतुल खांडेकर यांचे गायन, ईशान घोष यांच्या तबला वादनाने झाली. पहिल्याच दिवशी रसिकांनी मोठी गर्दी करीत उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान, जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांच्या कारकिर्दीला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाचे (kalshri sangeet mohotsav) उद्घाटन उद्योजक विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंडित सुधाकर चव्हाण, समीर महाजन, नंदकिशोर ढोरे, शशी सुधांशु, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा रेणुसे, आदित्य जगताप, गणेश ढोरे आदी उपस्थित होते.
महोत्सवात रिद्धी पोतदार यांनी मल्लरीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. तांडव लांस्य, भरतनाट्यम, परिमल फडके रचीत संरचीत, कृष्ण कीर्तनं गोवर्धन गिरिधारी, तेलगू भाषेतील जावळी काव्य प्रकार सादर केला. त्यांना नटुवंगमसाथ विद्या धिडे, गायनसाथ निथि नायर, मृदंगवर पंचम उपध्या, व्हायोलीनवर अजय चंद्र मौली यांनी, तर बासरीवर संजय साशिधरण साथसंगत केली. रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत रिद्धी पोतदार यांचे स्वागत केले.
पंडित अतुल खांडेकर यांनी राग मारूबिहाग आपल्या गायनाची बहारदार सुरुवात केली. त्यांनी विलंबित एकतालमध्ये बतीया ले जाओ ही बंदिश सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच मध्यलय एकतालमध्ये तराना आणि द्रुत तीनतालमध्ये बेगी तुम आवो ही बंदिश सादर केली. एकची टाळी झाली या अभंगाने आपल्या गायनाला विराम घेत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. त्यांना हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी, तबल्यावर प्रशांत पांडव यांनी, पखवाजवर गंभीर महाराज अवचार यांनी, तर स्वरसाथ व तानपुरा साथ श्रीज दाणी व भक्ती खांडेकर यांनी केली.
पहिल्या दिवसाची सांगता प्रसिद्ध तबला वादक इशान घोष यांच्या तबला एकलवादनाने झाली. त्यांनी पारंपरिक त्रिताल, अमीर हुसैन खा साहेबांचा मशहूर असा एक रेला, नयन घोष रचत एक रेला, पारंपरिक जुन्या बंदिशी, लखनौवी घराण्याची गत, अमीर हुसैन खा साहेबांची गत व कविता, उस्ताद फिरोज खान साहेब, उस्ताद मसिद खान साहेब यांच्या प्रसिद्ध त्रितालातील रचना, तसेच गुरू ज्ञानप्रकाश यांची चीज अशा अनेक बंदिशी व चीज वाजवित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनियमवर अभिषेक शिणकर यांची उत्तम साथ मिळाली.