17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeताज्या बातम्यासत्याची विचारधारा पकडुन राजकारणात याडॉ. कन्हैय्या कुमार यांचे मत

सत्याची विचारधारा पकडुन राजकारणात याडॉ. कन्हैय्या कुमार यांचे मत

१४व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात


पुणे, : सत्तेचे आणि सत्याचे असे दोनच प्रकारचे राजकारण आपल्या देशात आहे. सत्याच्या विचारधारेत संघर्ष भरपूर आहे. मात्र, या विचारधारेला धरुनच काम करा. सत्तेच्या राजकारणाच्या विरोधात हिंमतीने आणि विचारांनी लढून काम करायची इच्छा असेल, तेव्हाच राजकारणात या. तुम्हाला सत्तेच्या राजकारणाशी हातमिळवणी करून, आरामात आयुष्य जागता येईल. मात्र, सत्याची कास धरल्यावर तुम्हाला महात्मा गांधी, गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याची संधी मिळेल, असे स्पष्ट मत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयुआय) प्रभारी डॉ. कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात ’भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर’ या विषयावरील परिसंवादात डॉ. कुमार बोलत होते. या परिसंवादात हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया, खासदार राजकुमार रोत, खासदार ड. ए. ए. रहीम सहभागी झाले होते. यावेळी कुलगुरु डॉ. आर.एम.चिटणीस व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होत.


डॉ. कन्हैय्या कुमार म्हणाले की, आपल्या देशाचे राजकारण हे विचारधारेपेक्षा जुळवाजुळवीचे झाले आहे. देशातील राजकारण्यांना राजकारण हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सप्रमाणे वाटत असून, त्यांचा ते वेळोवेळी उपयोग करून घेत आहेत. राजकारणाच्या संरचनेत दोन प्रकाराचे लोक असतात. एक म्हणजे लाभ घेणारे, तर दुसरे राजकारणापासून पिढीत झालेले. तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्ही राजकारणाचे गोडवे गाता. मात्र, त्याच राजकारणापासून तुम्हाला त्रास होत असल्यास, तुम्ही त्याच्या विरोधात उभे रहाता. भारतात समानतेची आणि वैचारिक विचारधारा फार जुनी आहे. त्यामुळे ती कोणत्याही देशापासून आयात करण्याची आवश्यकता आहे. विचारधारा नसणारे लोक आणि कुत्र्यांमध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे विचारधारा नसल्यास, तुम्हाला प्रश्न विचारण्याची किंवा विरोधात लढण्याची हिंमतच आली नसती. लढाई नेहमी सत्य आणि सत्तेची राहिली आहे.
कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, आपल्याला इतिहासात रमून चालणार नाही. देशासाठी काय करायचे आहे, याचा विचार आपल्याला आता वर्तमानकाळात करायचा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी आपली लोकसंख्या ३४ कोटी होती, ती आता १४० कोटी झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश येथील लोकांच्या राहणीमान किंवा आर्थिक परिस्थितीचा महाराष्ट्रातील लोकांच्या परिस्थितीशी तुलना केल्यास, उत्तर आपल्याला मिळेल. सर्व राज्यांचा समान विकास होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. अजूनही लहान आणि मागास राज्यातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजांसाठी लढावे लागत आहे. तेथे अजूनही रोजगाराच्या समस्या आहे. मात्र, आपण देश म्हणून विकासाच्या मोठ्यामोठ्या गप्पा मारतो. आपल्याला देशातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून, आपली पावले टाकण्याची गरज आहे. आपल्या देशाला राईट किंवा लेफ्ट नाही, तर माणसाचा आणि माणुसकीचा विचार करणार्‍या विचारधारेची आवश्यकता आहे. तुम्ही राजकारणात जाण्यासाठी इच्छुक आहात, ही चांगली बाब आहे. भविष्यात लोकप्रतिनिधी होऊ शकले नाही, तरी देशासाठी आपल्याला चांगले योगदान द्यायचे आहे, हा विचार नक्की करा.

राजकुमार रोत म्हणाले की, देशातील गेल्या १० ते १५ वर्षाचा इतिहास पाहिल्यास राजकीय विचारधारा कमकुवत होत असून, व्यक्तिगत स्वार्थ वाढत आहे. एखादा लोकप्रतिनिधी १५ वर्षे एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो. मात्र, अचानक सत्तेसाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी विचारधारा सोडून दुसर्‍या पक्षात जात असल्याच्या घटना वाढत आहे. आपले शरीर हे एखाद्या राजकीय पक्षासारखे असून, त्यातील आत्मा ही राजकीय विचारधारा आहे. अशावेळी राजकीय विचारधारा नसणारे पक्ष म्हणजे आत्माविना शरीर असून, ते भविष्यात टिकू शकणार नाही. प्रत्येक विचारधारेत काही ना काही चांगल्या गोष्टी आहेत. आपल्याला त्या चांगल्या गोष्टी वेचायच्या आहेत. डाव्या विचारधारेत गरिबांचा विचार आहे, तर उजव्या विचारसरणीत प्रखर राष्ट्रवाद आहे. देशाची गरीबीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत तुमची विचारधारा कोणतीही असो, आपल्याला देशाचा मजबूत करायचे असून, त्या देशातील गरीब व्यक्तीचा विकास होण्याची गरज आहे. गरीबाला त्याचा हक्क मिळायला हवा. आपण जातीपातीच्या राजकारणातून बाहेर निघत नाही, तोपर्यंत आपला देश विश्वगुरू होणार नाही,
अ‍ॅड. ए. ए. रहीम म्हणाले की, देशातील श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत असून, त्यांची संपत्ती दुप्पट आहे. बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे देशातील निम्म्यापेक्षा अधिक संपत्ती आहे. त्याचवेळी गरीब आणि वंचित लोकांना जगण्यासाठी झगडावे लागत आहे. डाव्या विचारसरणीत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांचा विचार करण्यात येतो. त्यानुसार देशातील सर्व स्तरातील नागरिकांचा फायदा होईल, या दृष्टीने धोरणे आखली जातात. मात्र, उजव्या विचासरणीत श्रीमंतांचा विचार करण्यात येत असून, त्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ध्येय – धोरणे आखण्यात येतात. गरीबाला केंद्र बिंदू मानून शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रातील लाभ नागरिकांना मिळवून देणार्‍यांची कास आपल्याला पकडावी लागेल. डावी किंवा उजवी यापैकी कोणतीही विचारधारा कोणतीही असू द्या. मात्र, मानवतेची विचारधारा विसरू नका.
…..
वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन वाटचाल करा
….
भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असल्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन वाटचाल करा. तेव्हाच तुम्हाला फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स यामधील फरक कळेल. वैज्ञानिक दृष्टिकोन जपाल, तर भविष्यातील भारतासाठी ध्येयधोरणे आखू शकाल. बदलत्या काळात अशिक्षित लोकप्रतिनिधी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या बाबींवर धोरणे आखू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला इतिहासाची माहिती असायला हवी. इतिहास माहिती नसल्यास, तुम्हाला तुमची मते ठामपणे मांडता येणार नाही. त्यामुळे राजकारणात उच्चशिक्षित लोकांनी येण्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!