28 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
HomeBlogहिंदमाता व्याख्यानमालेला उत्साहात सुरुवात

हिंदमाता व्याख्यानमालेला उत्साहात सुरुवात

प्रा. अप्पासाहेब खोतांच्या कथाकथनाने रसिकांच्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू..!


तळेगाव दाभाडे : आई-वडील, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण या नात्यांमध्ये वितुष्ट यायला लागले आहे. ही नाती जपली जाऊन मने जुळली पाहिजेत, असे सांगतानाच ‘कोंबडी’ कथेने रसिकांमध्ये हास्यकल्लोळ, तर ‘महापूर’ कथा रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेली. एकप्रकारे एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, असे चित्र तळेगावकर रसिकांमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होते, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अप्पासाहेब खोत यांच्या कथाकथन कार्यक्रमाचे.
तळेगाव दाभाडे येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या २७व्या वर्धापनदिनानिमित्त कै. अॅड. विश्वनाथराव दाभाडे स्मृती हिंदमाता व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफत प्रा. खोत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रतिशिर्डी शिरगावच्या श्री साईबाबा संस्थानचे मुख्य विश्वस्त माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विठ्ठलराव काळोखे होते. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांना ‘हिंदविजय भूषण पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. यावेळी डॉ. कृष्णकांत वाढोकर, हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक अॅड. रविंद्रनाथ दाभाडे, भास्करराव म्हाळसकर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, संस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे, माजी अध्यक्ष राजेश सरोदे, उपाध्यक्ष अॅड. संजय वांद्रे, सचिव कैलास भेगडे, प्रदीप गटे, नामदेव आंद्रे, श्रीकृष्ण पुरंदरे, श्रीकृष्ण मुळे, प्रमोद देशक, आनंदराव देशमुख, सुधाकर देशमुख, अॅड. निवृत्ती फलके आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रा. खोत म्हणाले, की घराचे घरपण जपले पाहिजे. घरातील भांडण उंबऱ्याच्या बाहेर न जाता घरातच मिटायला हवे. क्षुल्लक कारणांवरून भांडत बसू नये. अन्यथा गावात हसू होते. त्यामुळे नातेसंबंध जपून स्नेह वाढायला हवा, असेही त्यांनी आपल्या कथाकथनमधून संदेश दिला. आपल्या ग्रामीण ढंगात कोंबडी कथा सांगत असताना रसिकांच्या समोर ग्रामीण चित्रण उभे केले. या कथेवेळी रसिकांना मनसोक्त हसायला भाग पाडले. तर आपल्या महापूर या दुसऱ्या कथेतून ओला दुष्काळ किती भयानक होता, माणसाबरोबरच पशु पक्ष्यांची भूक भूक करून झालेली दैना सांगितली.
रोजंदारीवर पोट असलेल्या हिरा नावाच्या महिलेचे आणि तिच्या तीन लेकरांचे खायला काही नसल्याने झालेले हाल कथन करताना प्रा. खोत सांगतात, की भावाच्या घरी तरी खायला मिळेल, या आशेने भर पावसात लेकरांसह घर सोडलेली हिरा मोठा पूर आलेला ओढा ओलांडते, भावाच्या घरी पोहोचते. मात्र, भावजयीचे टोमणे ऐकून क्षणभर बसून पुन्हा भर पावसात आपल्या घराच्या दिशेने निघते. ओढ्याला अगोदरपेक्षा पाणी वाढलेले असते. मोठ्या मुलाला व मुलीला एकेक करून ओढ्याच्या पलीकडे सोडते. पण छोट्या बाळाला घेऊन ओढा ओलांडत असताना पाणी अचानक वाढते आणि उंबराचे झाड पाण्यासोबत वाहत येत असताना हिरा बाळासह वाहून जाते. त्यानंतर दोन्ही लेकरांनी व भावाने फोडलेला टाहो रसिकांच्या अंगावर शहारे आणतात. रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.
माजी आमदार प्रकाशराव देवळे यांनी व्याख्यानमालेतील विषय वैविध्याचे कौतुक करीत पुढील वर्षी आपण कथाकथन करू, असा मानस बोलून दाखवला. विठ्ठलराव काळोखे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. पुरस्काराला उत्तर देताना प्रभाकर ओव्हाळ यांनी हा खऱ्या अर्थाने लोकसाहित्यिकाचा सन्मान आहे. यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना कैलास भेगडे यांनी व्याख्यानमालेची पार्श्वभूमी सांगत संस्थेच्या ताळेबंदाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सुहास धस व कैलास भेगडे यांनी, तर आभार राजेश सरोदे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28 ° C
28 °
28 °
34 %
2.2kmh
0 %
Fri
28 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!