पुणे : आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. नारी शक्तीचा सन्मान करण्याचा, महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस म्हणून महिला दिनाच्या औचित्याने जगभरात महिलांच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात.
पुणे सह जिल्हा निबंधक वर्ग एकचे संतोष हिंगाणे व सह जिल्हा निबंधक वर्ग दोनचे मंगेश खामकर यांच्या पुढाकाराने महिला अधिकाऱ्यांचा सन्मान म्हणून शहरातील सर्व दुय्यम निबंधक हवेली क्र.1 ते 27 या 27 कार्यालयांचा पदभार दि. 07/03/2025 रोजी (दि. 08/03/2025 सुट्टी असल्यामुळे) सर्व महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता.
दस्त नोंदणीचे कामकाज शासन आणि नागरिक यांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. असे जबाबदारीचे काम महिला समर्थपणे पेलू शकतात हे या निमित्ताने दिसून आले. शुक्रवार दि. 07/03/2025 रोजी शहरातील सर्व 27 दुय्यम निबंधक, तसेच विवाह अधिकारी या पदांचा कार्यभार महिला अधिकारी यांचेकडे देण्यात आला होता.
तसेच, सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) या पदाचा कार्यभार श्रीमती.संगिता जाधव पठारे यांच्याकडे तर, सह जिल्हा निबंधक (वर्ग-2) या पदाचा कार्यभार श्रीमती.राजश्री खटके यांच्याकडे एक दिवसासाठी सोपवण्यात आला होता.
महिला दिनाच्या निमित्ताने पदभार प्राप्त पुणे शहरातील सर्व महिला दुय्यम निबंधक व सह जिल्हा निबंधक महिला अधिकाऱ्यांचा पुषगुच्छ देऊन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयाने मागील वर्षीच्या महिलादिनी देखील हा उपक्रम राबविला होता. हा उपक्रम खरोखरचं स्तुत्य आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे, राज्याचे नोंदणी उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण व पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक दिपक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगला कार्यक्रम झाल्याचे दिसून आले. पुढील महिलादिनी पुणे शहराप्रमाणे राज्यभरात या प्रकारचा उपक्रम राबवून महिला अधिकाऱ्यांचा सन्मान व्हावा. महिला दिनाच्या जगभरातील सर्व माता भगिनींना शुभेच्छा.
- रोहन सुरवसे-पाटील
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस