पुणे : देशातील वातावरण तापले आहे. ते भयंकर विषारी झाले आहे. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याचे कौतुक करणारे संसदेची पायरी चढतात हा फरक या देशात झाला आहे. हा देश गांधी , नेहरूंचा आहे. या देशाला जिवंत राहायचे असेल आणि श्वास घ्यायचा असेल तर गांधी गांधी करावे लागेल,
असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभेतील खासदार डॉ. मनोज कुमार झा यांनी शुक्रवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित तीन दिवसीय गांधी विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. मनोज कुमार झा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष सुरेश द्वादशीवार,
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, गीताली वि म, सचिव अन्वर राजन, एम. एस. जाधव, मिलिंद गायकवाड , रमेश आढाव , प्रा. मच्छिंद गोरडे, अप्पा अनारसे
आदि उपस्थित होते. इसाक शेख , दोयल माजगावकर, पुनीत कौर, भंते सुदर्शन, प्रदीप चांदेकर, गणेश डंख, प्रदीप मेहता, ज्योती पोकळे यांनी सर्वधर्मीय प्रार्थना सादर केली.
तुषार गांधी लिखित द लास्ट डायरी आफ कस्तुर माय बा या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे,
द्वादशीवार लिखित स्मरण तसेच विविध पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. वक्तृत्व स्पर्धेतील पंकज कळसकर, शार्दुल बळी, भूषण महाजन, अनिकेत वनारे या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
झा म्हणाले, बापूंवर बोलणारे , ऐकणारे कमी होत चालले आहेत. परिस्थिती बदलली नाही तर आपल्या सारखे लोक केवळ संग्रहालयात असतील. गांधी आज असते तर त्यांनाही यूएपीए कायदा लावण्यात आला असता. औरंगजेब, बाबर आणि तुघलक यांच्या बाजूने किंवा विरोधात बोलून बातम्यांमध्ये राहण्याचे काम काही लोक सध्या करत आहेत. बापूंशी असहमत असू शकता. प्रत्येकाच्या विचारात फरक असतो. पण, बापूंना नाकारणार कसे ? सध्याचे नेते अहंकाराने त्रस्त आहेत. आपण आल्याने प्रकाश आला आणि आपण गेल्यानंतर अंधार पसरेल असे त्यांना वाटते. या लोकांपेक्षा देश मोठा आहे. रामाला आम्हीच शोधले असे हे लोक सांगतात. या लोकांच्या रामाला बापूंच्या रामासोबत उभे करून तुलना केली तर देशातील आजचे प्रश्न कळतील.
देशातील परिस्थितिवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, आज आपण बोलणे बंद केले आहे.
राजघाटावर जाऊन बापूंना श्रद्धांजली वाहण्याचे कर्मकांड झाले आहे. गांधींचा केवळ प्रतिमेसाठी वापर करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे. गांधी कधी मरणार नाही. आज सगळीकडे भिंती उभ्या झाल्या आहेत. आपले अस्तित्व हे सहअस्तित्वात दडले आहे, हे ओळखले पाहिजे. देश सध्या स्मशानातील शांतता अनुभवत आहे. आपल्याला ही शांतता नको आहे. देशाची परिस्थिती केवळ दहा वर्षांत वाईट झाली नाही. तर, वाईट होण्याच्या प्रक्रियेला आपण स्वीकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध औरंगजेब, गांधी विरुद्ध आंबेडकर , गांधी विरुद्ध नेहरू, नेहरू विरुद्ध पटेल अशी भांडणे लावली जात आहेत. खोटे समाजशास्त्र लादले जात आहे. मतभिन्नता होती पण या नेत्यांनी एकमेकाचे गळे कापले नाहीत. सध्या बोलणारा समाज नको आहे. मुकी जनावरे हवी आहेत. कोणी लाख प्रयत्न केले तरी आपण विभागले जाणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे.
देशमुख म्हणाले, देशातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्कृती ढासळली आहे. गांधी विचार मानवतेचा, सद्भावनेचा विचार आहे. गांधींना बदनाम करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न सुरू आहे. संघ परिवार आणि मूठभर अभिजन लोक गांधींना बदनाम करीत आहे. हे टाळायचे असेल तर तुम्ही , आम्ही सर्वांनी थोडे थोडे गांधी व्हायला पाहिजे. गांधींनी आपल्याला निर्भयता दिली. त्याआधारे आपण आतला आवाज ऐकला पाहिजे. गांधी कोणत्याही काळातले आधारकार्ड आहे. प्रास्ताविकात सप्तर्षी म्हणाले, आपला सोडून इतर धर्म शत्रू आहेत, असे आज सांगितले जात आहे. दुसऱ्या धर्माला शत्रू राष्ट्र समजले जाऊ लागले आहे. प्रत्येक निवडणूक लोकशाहीचा पराभव करीत आहे. सर्वांनी मिळून ही परिस्थिती सुधारली पाहिजे. या संस्थेची निर्मिती गांधींच्या हत्येनंतर पंधरा दिवसांनी झाली. जगात अनेक नेते झाले, पण केवळ गांधी नावाचा माणूस जगात हवाहवासा आहे. धनश्री यांनी सूत्रसंचालन केले. अन्वर राजन यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात लक्ष्मीकांत देशमुख यांची संहिता असलेला ‘भारतीय संविधान का संगीतमय सफर’ हा कार्यक्रम प्रदीप निफाडकर, धनंजय पवार आणि कलाकारांनी सादर केला.
अध्यक्षीय भाषणात सुरेश द्वादशीवार म्हणाले, जगाला दिशा देणाऱ्या थोड्या व्यक्ती होऊन गेल्या. त्यामध्ये गांधी आहेत. उपनिषदांनी , गौतम बुद्धांनी, सॉक्रेटिसने मानवाला दिशा दिली. त्यानंतर गांधींनी ते काम केले. महाराष्ट्र गांधींच्या बाबतीत कृतज्ञ राहिला नाही. महाराष्ट्राने गांधींना नेते, कार्यकर्ते, अनुयायी दिले. पण, येथील एकाही साहित्यिकाने गांधींचे चरित्र लिहिले नाही.
फ्रान्सच्या लेखकाला गांधींवर लिहावेसे वाटले पण मराठी साहित्यिकांना का वाटले नाही ? लुई फिशर यांना लिहावेसे वाटते. अॅटनबरो यांना चित्रपट काढला. मात्र आपण असे काहीच केले नाही. मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी आणि गांधीवादी यांनी गांधींना न्याय दिला नाही. सध्याच्या लेखकांना मार्क्सवादी, हिंदुत्ववादी, आंबेडकरवादी आणि गांधीवादी या गटात बसवले जाते. स्पष्ट बोलू दिले जात नाही म्हणून आपण न बोलण्याची सवय लावून घेतली आहे. शेतकरी, कामगार, हिंदू, दलित या सर्वांचे नेते गांधी होते.