सोलापूर/ पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू असून, सदर कामाच्या अनुषंगाने श्रींच्या गाभाऱ्यातील दगडी कामाच्या कोटींगसाठी पुरातत्व विभागाने मंदिर समितीस तात्काळ लेखी अहवाल सादर करावा तसेच सध्या सुरू असलेली कामे आषाढी यात्रे पूर्वी म्हणजे 5 जून पूर्वी पूर्ण करावीत अशा पुरातत्व विभागास सुचना करण्यात आल्या तसेच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत टिसीएस कंपनीच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मंदिर जतन, संवर्धन कामाचा तसेच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टिसीएस कंपनीच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. तथापि, काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बैठक रद्द करण्यात आली.
श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास vithal rukamini bhaktniwas, पंढरपूर येथे सह अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर जतन व संवर्धन तसेच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, डॉ.विलास वाहणे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग पुणे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच जतन व संवर्धन कामाचे ठेकेदार व टिसीएस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये तिरूपती , शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्याची चाचणी घेण्याचा आढावा घेण्यात आला. त्याबाबत उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व पटवारी यांचेशी चर्चा करण्यात आली.
टोकन दर्शन प्रणालीच्या चाचणीचे तीन टप्पे करण्यात आले असून, कमीत कमी गर्दीच्या दिवशी पहिली चाचणी, नंतर मध्यम गर्दीच्या दिवशी दुसरी व महिन्याच्या एकादशीच्या दिवशी तिसरी अशा एकूण तीन चाचण्या घेण्यात येणार असून, या प्रणालीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेऊन भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत सध्या सुरू असलेली कामांश्रींचा गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप व इतर अनुषंगीक ठिकाणची कामे 5 जून पूर्वी पूर्ण करणे तसेच श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील दगडी कामास कोटींग करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत पुरातत्व विभागास लेखी अहवाल देण्याच्या सुचना करण्यात आल्या. याशिवाय, मंदिरातील फायर फायटींग व इलेक्ट्रीक कामाची ई निविदा अंतिम झाली असून, त्याचे काम देखील आषाढी पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करणे इत्यादी निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.