‘एमआयटी एडीटी’च्या ‘पर्सोना महोत्सवा’ला प्रारंभ
पुणेः कला ही सार्वभौम असून तिला कुठल्याही एका साच्यात बांधता येत नाही. कला ही माणसाला सामाजिकरित्या जिवंत ठेवते. कलाच माणसाला सुखी, समृद्ध आणि आनंदी जीवन जगायला भाग पाडते. त्यामुळे,विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कुठली तरी एक कला आत्मसात करावी. सध्याचा काळ चित्रपटांनी २००, ५०० कोटींचा व्यवसाय केला, हे सांगणारा आहे. त्यात सध्या मनोरंजन क्षेत्राचे सोनेरी दिवस चालू असून कलाकारांना प्रचंड करिअर संधी प्राप्त होत आहेत. त्यामुळे तरुणांनी या क्षेत्राकडे वळायला हवे, असे मत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सातव्या ‘पर्सोना फेस्ट-२५’ या वर्षातील सर्वांत मोठ्या कला महोउत्सवाच्या उद्घाटनात बोलत होते. याप्रसंगी, कांची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जयशंकरण, सौ.उषाताई विश्वनाथ कराड, ‘एमआयटी एडीटी MIT ATD’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.विपुल दलाल, डाॅ.रेणू व्यास, डाॅ.सुराज भोयार आदी उपस्थित होते.

डाॅ.जयशंकरन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे महत्व विशद करताना, त्यासाठी आध्यात्म आणि तत्वज्ञान यांची गरज समजावून सांगितली. तसेच, पर्सोना सारख्या महोत्सवांना नव्या शैक्षणित धोरणात (एनईपी) अत्यंत महत्वपूर्ण स्थान असल्याचेही त्यांनी म्हटले. प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दैनंदिन गरजांसोबत एखादा छंद जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, त्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्यातील कलाकार, गायक, चित्रकार, कवीच्या आदी आवडी-निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यामाध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पर्सोना फेस्ट’चे विद्यापीठातर्फे दरवर्षी आयोजन केले जाते. ‘पर्सोना’सारख्या कलात्मक उत्सवांच्या माध्यमातूनच देशाच्या कला संस्कृतीत भर टाकण्याचे बाळकडू विद्यार्थ्यांना विद्यापीठीय जीवनात मिळते, असेही ते म्हणाले.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता, पसायदानाने करण्यात आली. प्रास्ताविक कुलगुरू डाॅ.राजेश एस. यांनी तर आभार, स्कुल आर्किटेक्चरच्या डाॅ.अश्विनी पेठे यांनी मानले.
पुढील दोन दिवस सेलिब्रिटींची रेलचेल-‘पर्सोना फेस्ट’साठी विश्वराजबागेचा कॅम्पस अतिशय सुंदरित्या सजविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस चालणाऱ्या या कला उत्सवासाठी मराठी, हिंदी कलाक्षेत्रातील अनेक अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह गायक, दिग्दर्शक यांसह अनेक सेलिब्रेटी विद्यापीठात हजेरी लावणार आहेत.

…ही तर राज कपूरांची कर्मभूमी
एमआयटी एडीटी विद्यापीठाची ही भूमी जगप्रसिद्ध अभिनेते राज कपूर rajkapoor यांचा सहवासाने पावन झालेली त्यांची कर्मभूमी आहे. येथे त्यांची आठवण सांगणारी समाधी, मेमोरियल सह अनेक वास्तू असून याच भूमीवर त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘राम तेरी गंगा मैली’ सह अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण केलेले आहे. ही विश्वराजबाग राज कपूरांच्या ऋदयाच्या अत्यंत जवळ होती. त्यामुळे, येथे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतः भाग्यवान समजायला हवं, असेही डाॅ. पटेल पुढे बोलताना म्हणाले.