पिंपरी – उद्याची पिढी घडवताना माणसं घडविणे हे शिक्षणाचे महत्वपूर्ण कार्य असून देशाचा जबादार नागरिक घडविण्याची जबाबदारी ही शिक्षक आणि शाळांवर आहे. महापालिकेच्या शाळेला पीएम श्री हा बहुमान मिळाला ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयात पीएम श्री उपक्रमाअंतर्गत “राष्ट्रीय शिक्षण २०२० –चला नवी पिढी घडवूया” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका मंजुषा टिळेकर,हर्षदा राऊत यांच्यासह पत्रकार, शाळेतील शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
संजय आवटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करताना आधी संवेदनशील माणूस होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा सर्वांगीण विकास साधने आणि त्यांचा दृष्टीकोन विकसित करणे हे शिक्षक आणि शिक्षणाचे महत्वपूर्ण कार्य आहे. विद्यार्थ्यांनी विचार करण्याबरोबरच प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे, आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे, असेही आवटे म्हणाले.
यावेळी सहायक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, महापालिकेच्या शाळांना अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण देण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कला, क्रीडा, शिक्षण अशा सर्व घटकांवर भर देत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी केले. इस्माईल मुल्ला यांनी सूत्रसंचालन तर रुपाली गाथा यांनी आभार प्रदर्शन केले.