जात-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून विश्वशांतीसाठी प्रार्थना
पुणे : विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागातर्फे आज (दि. 9) विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतासह 108 देशांमधील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू झालेला हा सोहळा नऊ वाजून 36 मिनिटांनी संपला. जात-धर्म-पंथाच्या सीमारेषा ओलांडून पुणे व परिसरातून जवळपास अकरा हजार स्त्री-पुरुषांनी नवकार महामंत्राचे पठण केले. देशातच नव्हे तर जगात शांतता नांदावी, सुखसमृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या ग्राउंडवर आज भव्य-दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. प. पू. आ. लब्धीप्रभ सुरीश्वरजी, प. पू. जयप्रभ विजयजी मसा, प. पू. आ. विरागसागर सुरीश्वरजी महाराजा आदि ठाणा, प. पू. पन्यास तत्वरत्न विजयजी, प. पू. उपाध्याय गौतममुनीजी, प. पू. सा. सिद्धीपूर्णा श्रीजी म. सा. आदि ठाणा, प. पू. सा. चारुयशाश्री म.सा., प. पू. अर्हद ज्योतीजी म. सा., प. पू. सौम्याज्योतीजी म. सा., प. पू. गुरूछायाजी म. सा., प. पू. चारुप्रज्ञाजी मा साहब आदि ठाणा, प. पू. वैभवमुनीजी म. सा. यांची प्रवित्र उपस्थिती होती.
पारंपरिक वेश परिधान करून, विश्वकल्याणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्त्री-पुरुष या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तरुणांची संख्याही लक्षवेधी होती. नवकार मंत्राच्या सामूहिक पठणादरम्यान वंदे नवकारम् जय जिनेंद्र या घोषणेने वातावणात चैतन्य निर्माण झाले. सुरुवाती दर्डा परिवारातर्फे शंखनाद करण्यात आला.
दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या उपक्रमात सहभाग होता. नवकार महामंत्राच्या पठणानंतर मंत्राच्या महात्म्याचे वर्णन करून उपस्थितांना संबोधन करताना नरेंद्र मोदी म्हणाले, हा मंत्र देश-विदेशासह अनेक ठिकाणी एकाचवेळी पठण केला जात आहे त्यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा अभूतपूर्व आहे. हा केवळ मंत्र नसून आस्थेचे केंद्र, जीवनाचे मूळ स्वरूप आहे. नवकार मंत्राची नऊ तत्त्वे सांगून या उपक्रमानिमित्त नागरिकांनी नऊ संकल्प करावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना पाणी बचत, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, स्वच्छता, स्वदेशीचा स्वीकार, देशदर्शन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवनपद्धती, योग आणि क्रीडा यांचे महत्त्व, गरिबांना मदत या नऊ सूत्रांचा प्रत्येक नागरिकाने अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
युवा कलाकार विश्व विशाल चोरडिया याने नवकार मंत्राचे पठण केले. त्यास शिव विशाल चोरडिया याने तबलासाथ केली. विनित घेमावत यांनी नवकार महामंत्राची महिती सांगणाऱ्या भक्तीरचना सादर केल्या. सचिन इंगळे आणि सहकाऱ्यांनी सहवादनातून नवकार महामंत्र सादर केला.
केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती. पुणेकरांशी संवाद साधताना जय जिनेंद्र असा जयघोष करून ते म्हणाले, हा एक मंगलमय धार्मिक सोहळा असून यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. 68 अक्षरांच्या या मंत्राचा महिमा अपरंपरा असून यात ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गुरूंना वंदन केले आहे. विश्वकल्याणासाठी पुणेकर जातीभेद विसरून मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
स्वागतपर प्रास्ताविकात दिनेश ओसवाल म्हणाले, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंद्रकुमार छाजेड म्हणाले, पुण्यासह भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक शहरांमधून नवकार मंत्राचे एकाच वेळेला पठण होत आहे, यातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत आहे, जी विश्वशांती व विश्व कल्याणाला पोषक ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले, अभिजित डुंगरवाल, विशाल चोरडिया, अचल जैन यांनी प्रयत्न केले.