पिंपरी,- राज्यातील गडकोट किल्ल्यांचा वारसा जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही फक्त सरकारची जबाबदारी नसून ते आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. याबाबत युवकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेला दुर्गवेध हा ऐतिहासिक वारसा जपणारा उपक्रम प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या गडसंवर्धन समितीचे माजी सदस्य व इतिहास अभ्यासक आनंद देशपांडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि समान संधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गवेध २.० हा ऐतिहासिक वारसा जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवणे, चित्रकला, पोस्टर मेकिंग, कविता, पोवाडा, भारूड, वक्तृत्व आणि रील मेकिंग अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि
डॉ. सचिन जोशी व अक्षय चंदेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आनंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, विद्यार्थी कल्याण व विकास उप अधिष्ठाता प्रा. राजकमल सांगोले, रासेयो कार्यक्रम अधिकारी संजय मापारी, रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी सचिन गिरवले, समन्वयक डॉ. शैलेन्द्र बन्ने, कार्यक्रम विद्यार्थी समन्वयक अपूर्वा मोरे, शांतनू माळी, चिराग जथे आदी उपस्थित होते.
या किल्ले बांधणी स्पर्धेत प्रत्येकी सात विद्यार्थ्यांचा एक संघ अशा एकूण १४ संघांनी सहभाग घेतला होता. त्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती अत्यंत कौशल्याने साकारल्या. किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी तत्त्वांचा प्रभावी वापर करून ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. किल्ल्यांच्या वास्तुशिल्प, रचना आणि संरक्षणात्मक वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करून, मॉडेल्समध्ये तटबंदी, बुरुज, खंदक, आणि प्रवेशद्वार याची अचूक नोंद केली. परीक्षक मंडळाने प्रथम क्रमांक टीम शिलेदार, द्वितीय क्रमांक टीम स्वराज्य, तृतीय क्रमांक टीम सात मावळे यांची निवड केली. तसेच प्रेक्षकांच्या मतदानानुसार प्रथम क्रमांक टीम सह्याद्री प्रतिष्ठान, द्वितीय क्रमांक टीम अभेद्यसेना आणि तृतीय क्रमांक टीम स्टोन गार्डियन्स यांची निवड केली.
