मुंबई – मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये भारतातील पहिल्यांदाच ऑनबोर्ड एटीएम(Onboard cash withdrawal railway) बसवण्यात आलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र व मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला असून, यामुळे हजारो प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांची सहज उपलब्धता मिळणार आहे.
ही सुविधा एक्सप्रेसच्या एसी चेअर कार (AC TRAIN) डब्यातील मागच्या बाजूस बसवण्यात आली असून, येथे पूर्वी लहान पँट्रीचा वापर होत असे. मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये या डब्यात विशेष संरचनात्मक बदल करून शटर दरवाजा, विद्युत जोडणी, नेटवर्क कनेक्टिव्हिटी यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ऑटोमेटेड टेलर मशीन (ATM) गाडी चालू असतानाही कार्यरत राहणार असून, मोबाईल नेटवर्कद्वारे सतत ऑनलाइन राहील. त्यामुळे कुठेही थांबण्याची गरज न पडता कधीही पैसे काढणे शक्य होणार आहे.
🧓🏻 महिलांसाठी, वृद्ध प्रवाशांसाठी आणि तातडीच्या गरजांसाठी फायदेशीर
पंचवटी एक्सप्रेसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक यांना ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. रेल्वेच्या गिनीज बुकात नोंद असलेल्या या गाडीला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे.हे एटीएम सध्या प्रवाशांच्या वापरासाठी सज्ज असून लवकरच औपचारिकरित्या कार्यान्वित होईल.