पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये(Free Uniform Scheme Maharashtra) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश मिळणार आहेत. केंद्र व राज्य शासनाने मिळून या योजनेसाठी तब्बल २४८ कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शाळा सुरू होताच नव्या गणवेशात विद्यार्थ्यांची रंगतदार उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी जसा ऑगस्टपर्यंत गणवेश मिळायचा, तो विलंब यंदा होणार नाही. समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, पहिल्याच दिवशी दोन्ही गणवेशांचे वाटप अनिवार्य करण्यात आले आहे.
निधीचे वितरण कसे:
केंद्र सरकारकडून समग्र शिक्षेच्या अंतर्गत ४२ लाख ९७ हजार ७९० पात्र विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये प्रति विद्यार्थ्याच्या दराने १८१ कोटी ४७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याशिवाय, राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या ११ लाख विद्यार्थ्यांसाठी ६६ कोटी ९४ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे.
अधिक लाभ:
- पहिली ते आठवीतील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी व दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले या योजनेस पात्र आहेत.
- याशिवाय विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजेही देण्यात येणार आहेत.
- नव्याने प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही दोन गणवेश मिळणार आहेत.
महत्त्वाचे निर्देश:
- एकाच विद्यार्थ्याला दोनदा गणवेशाचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्या महापालिका किंवा संस्थांनी स्वतःच्या निधीतून गणवेश पुरवले आहेत, तेथे समग्र शिक्षेतील लाभ लागू होणार नाही.
- शाळेच्या गणवेशाचा रंग व प्रकार याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने शासन निर्देशानुसार निर्णय घ्यावा.
या निर्णयामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकणार, तर शाळेच्या रंगीबेरंगी वातावरणात भर पडणार आहे.