पुणे : महावितरणच्या (mahavitaran) पुणे परिमंडलाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत सलग तिसऱ्यांदा राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे लघु प्रशिक्षण केंद्राने (TrainingExcellence) २८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत राज्यभरातील २५ केंद्रांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली.
या केंद्राने वर्षभरात ६,८५८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्युत क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.
त्यासोबतच ९,५०० विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी आणि १ लाख २६ हजार नागरिकांना वीजसुरक्षा, ऊर्जा बचत, डिजिटल ग्राहकसेवा यांसारख्या विषयांवर जागरूक करण्याचे काम केले.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. संतोष पाटणी यांच्या समन्वयाने प्रशिक्षण कार्यक्रमांना गती मिळाली.
महावितरण व विद्युत महाविद्यालयांमधील सामंजस्य करारांमुळे तरुण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व आधुनिक वीजसेवेबाबत थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
राज्याच्या मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा विभागाने घोषित केलेल्या मानांकनात पुणे परिमंडलाने पुन्हा सर्वोच्च शिखर गाठल्याने, वीजसेवा क्षेत्रात ‘पुणे पॅटर्न’ नव्या उंचीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण, प्रबोधन आणि जनजागृतीचा त्रिवेणी संगम
पुणे लघु प्रशिक्षण (PunePower)केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्तरांवर प्रशिक्षण व प्रबोधन कार्यक्रम राबवले गेले.
सन २०२४-२५ मध्ये प्रशिक्षण केंद्राने –
- ६,८५८ अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना
- ९,५०० विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना
- १,२६,००० नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना
विद्युत सुरक्षितता, सौर ऊर्जा, वीज वितरण व्यवस्था, वीजचोरी प्रतिबंधक उपाय, प्रथमोपचार, ताणतणाव व्यवस्थापन, वीजबचत, डिजिटल ग्राहकसेवा अशा विविध विषयांवर प्रशिक्षण, कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रमांद्वारे मार्गदर्शन केले.
तांत्रिक कौशल्य वृद्धीला प्रोत्साहन
महावितरणने पुणे परिमंडलातील ३३ विद्युत अभियांत्रिकी महाविद्यालयांशी सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या करारांमुळे विद्यार्थ्यांना वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, वीज सुरक्षा आणि ग्राहकसेवा तंत्रशास्त्र यामधील ज्ञानाची देवाणघेवाण शक्य झाली आहे.
यामुळे महाविद्यालयीन पातळीवरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळत असून, विद्युत क्षेत्रातील भावी कौशल्यवृद्धीस हातभार लागला आहे.
ग्रामीण आणि शहरी भागात व्यापक जनजागृती
फक्त कर्मचारी आणि विद्यार्थीच नव्हे तर घरगुती वापरकर्ते, लहान व मोठ्या शाळांतील विद्यार्थी, नागरिक, संस्था, आणि एजन्सी यांच्यासाठीही पुणे परिमंडलाने वीज सुरक्षेसंदर्भात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. शहरी व ग्रामीण भागात वीज बचत, डिजिटल ग्राहकसेवा, घरगुती व सार्वजनिक वीजसुरक्षा यावर आधारित शिबिरे, मेळावे, कार्यशाळा आणि सत्रांचे आयोजन करण्यात आले.
यातून एकूण १ लाख २६ हजार नागरिकांपर्यंत थेट संपर्क साधण्यात यश आले.
प्रशिक्षणातून गतिमान प्रशासन व उत्तम ग्राहकसेवा
मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, “इझ ऑफ लिव्हिंगच्या संकल्पनेनुसार महावितरणमध्ये ग्राहकसेवा गतिमान करण्यावर भर दिला आहे.
यासाठी कर्मचाऱ्यांचे तांत्रिक व प्रशासनिक कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळांचा वेग वाढवण्यात आला.
त्याचा सकारात्मक परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत झाला आहे.”
राज्यातील उत्कृष्टतेचा मान पुन्हा पुण्याच्या नावावर
महावितरणच्या नाशिक येथील मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या राज्यस्तरीय मानांकनात पुणे परिमंडल लघु प्रशिक्षण केंद्राने सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे.
ही कामगिरी पुण्याच्या वीजवितरण सेवेला नवी उंची देणारी ठरली आहे.