81 प्रकारचे पक्षी, त्यात युरोपातून आलेले पाहुणेही!
ग्रीन वॉर्बलर, रेड ब्रेसेड फ्लायकॅचर, ट्री पिपिट आणि किती तरी स्थानिक सुंदर पाहुणे एका जागी.
विद्यार्थ्यांनी केलेल्या पक्षीगणनेत 2186 निरीक्षणे नोंदली गेली.
प्रकृती आणि निसर्ग प्रेमाला हातभार लावणारा अनोखा उपक्रम!

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या हिरव्या गार परिसरात यंदा तब्बल 81 प्रकारच्या पक्ष्यांचे आगमन झाले असून, यामध्ये ग्रीन वॉर्बलर, रेड-ब्रेसेड फ्लायकॅचर आणि ट्री पिपिट यांसारख्या युरोपातून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचाही समावेश असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या पक्षीगणनेत समोर आली आहे.
हा उपक्रम महाविद्यालयाच्या नेचर क्लबने आयोजित केला होता.
वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी महाजन म्हणाल्या, “थंडीच्या काळात युरोपमध्ये खाद्य टंचाई भासल्याने हे पक्षी उबदार हवामान असलेल्या भारताकडे स्थलांतर करतात. प्रवासादरम्यान त्यांचे वजनही घटते. फर्ग्युसन महाविद्यालयाचा जैवविविधतेने समृद्ध परिसर त्यांच्या सुरक्षित आश्रयासाठी आदर्श ठरतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान हे पाहुणे येथे वास्तव्य करतात.”
तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) पक्षी जमिनीपासून 10-12 फूट उंचीवरील वाळलेल्या खोडात घरटे बनविताना पाहायला मिळाला. याशिवाय घार, पोपट, मैना, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक, तांबोली, शिपाई बुलबुल आणि घुबड यांसारखे स्थानिक पक्षीही मोठ्या संख्येने नोंदवले गेले.

14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या पक्षीगणनेत 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
2186 निरीक्षणे ॲपद्वारे नोंदवण्यात आली. हा उपक्रम ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक मोहिमेचा भाग होता, ज्याचे आयोजन कॅर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी आणि नॅशनल ऑडुबॉन सोसायटीने केले होते.
देशभरातून 6,500 हून अधिक पक्षीप्रेमींनी 66 हजार निरीक्षणे नोंदवून 1086 प्रजातींचा अभिलेख तयार केला. महाराष्ट्रात 500 हून अधिक सहभागींनी 400 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद केली.
विद्यार्थी सिद्धांत म्हात्रे म्हणाला, “हवामान बदल आणि शहरीकरणामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा उपक्रमामुळे आमच्यात जागरूकता निर्माण झाली.”
पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थिनी मुस्कान श्रीवास्तव म्हणाली, “पक्षी निरीक्षणामुळे विज्ञान आणि सर्जनशीलतेची सांगड घातली गेली. शिक्षणात प्रात्यक्षिक अनुभवांची भर पडली.”
या उपक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. विजय तडके आणि डॉ. मीनाक्षी महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.