भोसरी, – प्रेम, करुणा आणि मानवी एकतेचा संदेश देणारा ‘मानव एकता दिवस’ संत निरंकारी मिशनच्या वतीने भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड येथे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी आयोजित रक्तदान शिबिरात ६९७ सेवाभावी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निष्काम सेवेचे उदाहरण घालून दिले.
बाबा गुरबचनसिंहजी महाराजांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ साजरा होणारा मानव एकता दिवस, केवळ श्रद्धांजली नव्हे, तर मानवी एकतेचा प्रकट उत्सव ठरतो. याच प्रेरणेने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनमार्फत देशभर ५००हून अधिक शाखांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली.

भोसरी येथील शिबिरात YCM रुग्णालय रक्तपेढीने २१६ युनिट्स, ससून रुग्णालयाने १०१ युनिट्स, तर संत निरंकारी रक्तपेढीने ३८० युनिट्स रक्त संकलन केले. या उपक्रमात समाजातील अनेक सजग नागरिकांनी देखील सहभागी होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
संत निरंकारी मिशनचे युगपुरुष बाबा गुरबचनसिंहजी यांनी अध्यात्मिक शिकवणुकीद्वारे समाजातील अंधश्रद्धा, नशा आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध व्यापक जनजागृती केली. त्यांचे कार्य पुढे नेत बाबा हरदेवसिंहजी यांनी “रक्त नाड्यांमध्ये वाहावं, नाल्यांमध्ये नाही” या संदेशाद्वारे रक्तदानाला मिशनच्या सेवेचा अविभाज्य भाग बनवले.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा सेवा आणि एकतेचा संदेश या उपक्रमातून समाजात पोहोचविण्यात आला. आरोग्य तपासणी, स्वच्छता आणि रक्तदात्यांसाठी उत्तम जलपान व्यवस्था यामुळे शिबिराचे व्यवस्थापन आदर्शवत राहिले.
‘मानव एकता दिवस’ हे चाचा प्रतापसिंहजी व इतर समर्पित संतांच्या त्यागाची स्मृती असून, हा दिवस सेवा, समर्पण आणि मानवतेच्या मूल्यांना वाहिलेला आहे.
संत निरंकारी मिशनद्वारे राबविण्यात आलेला हा उपक्रम, मानवता हाच खरा धर्म या तत्त्वज्ञानाची जिवंत शिकवण आहे.