पिंपरी, — केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते येत्या रविवारी, २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता, पिंपरी-चिंचवडमधील आरपीआय शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
हे नवीन व अत्याधुनिक पक्ष कार्यालय वाकड येथील जैतवन बुद्ध विहार शेजारी, वेणूनगर, पुणे-५७ येथे उभारण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याचे आयोजक व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी ही माहिती दिली.
कार्यक्रमात राजकीय, सामाजिक व कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, तसेच आरपीआयच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट होईल व कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याचे नवे केंद्र मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.