पिंपरी-चिंचवड : शहरातील निळ्या पूररेषेतील बाधित क्षेत्रांच्या पुनर्विकासासाठी आणि अधिकृत इमारतींना पूर्ण क्षमतेने ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट्स (TDR) देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याचे संकेत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील निळ्या पूररेषेतील जुन्या, अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी धोरण आखण्यावर भर देण्यात आला. आमदार जगताप यांनी विधानसभेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर, नदीचे बाइंडिंग करणे, पूररेषेची फेरआखणी करणे आणि त्यानुसार पुनर्विकासाच्या धोरणाला दिशा देणे गरजेचे असल्याचे बैठकीत ठरले.

याशिवाय, अधिकृत बांधकामांना पूर्ण क्षमतेने वाढीव टीडीआर देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले. या निर्णयांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना शहरातील निळ्या पूररेषा बाधित अधिकृत इमारतींबाबत सविस्तर प्रस्ताव व अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या पूररेषेत सुरू असलेल्या बांधकामांना तात्पुरती स्थगिती देऊन मार्गदर्शक सूचना मागवण्याचे आदेशही देण्यात आले.
या बैठकीस महापालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर, नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या धोरणात्मक निर्णयामुळे निळ्या पूररेषेतील पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळण्याची आणि बाधित रहिवाशांना अधिकृतपणे पुनर्विकासाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अनधिकृत बांधकामांवर कारवाई आणि अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला स्पष्ट दिशा मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड, निळी पूररेषा, पुनर्विकास, टीडीआर, नगर विकास राज्यमंत्री, माधुरी मिसाळ, शंकर जगताप, महापालिका, अधिकृत इमारती, बांधकाम, पुणे, नदी, पूर नियंत्रण, पुनर्वसन
Hashtags
#पिंपरीचिंचवड #नीळ्यापूररेषा #पुनर्विकास #TDR #नगरविकास #माधुरीमिसाळ #शंकरजगताप #महापालिका #पुणे