मंगळवार- ५० व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ मा. आमदार उल्हास पवार व उद्योजक श्री पुनीत बालन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाला. यावेळी ३२१ भाविकांनी रक्तदान केले.
दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस सातत्याने ५० महिने रक्तदान शिबीर आयोजीत करणारी शंकर महाराज समाधी ट्रस्ट ही एकमेव संस्था असून या पुर्वीच महाराष्ट्र शासनाने संस्थेस गौरव चिन्ह देऊन सन्मानीत केले आहे.

ट्रस्ट तर्फे दररोज ५,००० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसादाचे वाटप होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि धर्मवीर संभाजी शाळा नवी पेठ या तीन ठिकाणी दररोज मोफत भोजन प्रसादाचे वाटप होते, अशी माहिती विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर यांनी दिली.
या प्रसंगी उल्हास पवार म्हणाले आज मठ, मंदिर या सारख्या धार्मिक संस्थांनी आध्यात्मिक उपक्रमां बरोबरच समाजामध्ये सेवाभाव वाढवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याची अत्यंत गरज आहे, ज्या योगे तरूणांना श्री सद्गुरू शंकर महाराजांची भक्ती आणि नामस्मरण यासोबतच समाजाची सेवा करण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच सामाजिक कार्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त होईल.
श्री पुनीत बालन यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासीत केले. याप्रसंगी शिबीर सम्नवयक श्री राम बांगड यांना सन्मानीत करण्यात आले.