पुणे- पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या काळात बंदोबस्तासाठी येणाऱ्या आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांना पुनीत बालन ग्रुपकडून जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ६ हजार पुरुष आणि २ हजार महिला पोलिसांचा समावेश आहे. हे कीट त्यांच्या वारीतील सेवा काळात दैनंदिन गरजा पूर्ण करणारे असून, या उपक्रमामुळे पोलीस बंदोबस्त अधिक सक्षम व सुसज्ज होणार आहे.
प्रत्येक वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि लाखो वारकऱ्यांच्या आगमनानिमित्त पंढरपूरमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, त्यासाठी पंढरपुरात ८ हजार पोलिस कर्मचारी आठ दिवस मुक्कामी असणार आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे केली होती. त्यानुसार, बालन यांनी तातडीने प्रत्युत्तर देत कीट उपलब्ध करून दिले.
हे कीट पंढरपूरचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, यात पुढील वस्तूंचा समावेश आहे :
- कोलगेट पाऊच
- पॅराशूट तेल बॉटल
- ओडोमास
- ग्लुकोज
- डेटॉल साबण
- शेंगदाणा चिक्की
- मास्क
- पाण्याची बॉटल
- महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड
या उपक्रमाबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले,
उन, वारा, पाऊस यांची तमा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं काम हे पोलिस बांधव करत असतात. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी हे किट वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्याचं समाधान वाटतं.“
गतवर्षीही पुनीत बालन ग्रुपकडून असा उपक्रम राबवण्यात आला होता. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून वारीतील पोलीस सेवेतील योगदानासाठी ही मदत दिल्यामुळे प्रशासनाकडूनही समाधान व्यक्त होत आहे.