मुंबई : सिग्नेचर ग्लोबल ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (अपरिवर्तनीय कर्जरोखे) जारी करून ८७५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या रकमेचा उपयोग होणार आहे.
एका किंवा अधिक टप्प्यात खासगी प्लेसमेंट आधारावर सिक्युअर्ड लिस्टेड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) जारी करून निधी उभारण्यास सिग्नेचर ग्लोबलच्या संचालक मंडळाने मान्यता दिली. ही रक्कम ८७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
सिग्नेचर ग्लोबलचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल म्हणाले, निधी उभारण्यासाठी आम्ही संचालक मंडळाची मान्यता घेतली आहे. आम्ही शेअरहोल्डर्सचीही मंजुरी घेऊ. कंपनी सध्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ४५० कोटी रुपये वापरेल तर उर्वरित रक्कम व्यवसाय वाढीसाठी वापरण्यात येईल. शेअरहोल्डर्सच्या मान्यतेनुसार ऑगस्टच्या अखेरपर्यंत निधी उभारण्याचे लक्ष्य कंपनीने बाळगले आहे.”
हे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्यासाठी शेअरहोल्डर्सची मर्यादा वाढवण्यासाठी, कर्ज घेण्याची मर्यादा वाढवण्यासाठी, सेक्युरिटीच्या निर्मितीवरील मर्यादा वाढवण्यासाठी आणि कंपनीच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी पोस्टल मतपत्रिकेच्या नोटिशीला कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, विक्री बुकिंगच्या बाबतीत कंपनी पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सूचीबद्ध रिअल इस्टेट कंपनी म्हणून उदयास आली आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात १०,२९० कोटी रुपयांच्या मालमत्ता विकल्या आणि चालू आर्थिक वर्षात १२,५०० कोटी रुपयांच्या प्री-सेल्सचे लक्ष्य बाळगले आहे.
सिग्नेचर ग्लोबलने परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या विकासाच्या हेतूने व्यवसाय सुरू केला होता, परंतु गुरुग्राममध्ये जमिनीच्या किमती जास्त असल्याने आता तिने मध्यम उत्पन्न असलेल्या, प्रीमियम घरांवर लक्ष केंद्रित केले आहे.