पुणे- पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाची दिलासादायक घोषणा करत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, येत्या काळात पुण्यातून थेट युरोपसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी मर्यादित असल्याने अशा प्रकारची थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे शक्य नसली, तरीही आता धावपट्टीच्या विस्ताराचे काम सुरू झाले असून, एकदा हे काम पूर्ण झाले की थेट युरोपकडे जाणाऱ्या विमानांना पुण्यातून उड्डाण घेता येणार आहे.
मोहोळ यांनी स्पष्ट केले की, या महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पासाठी सुमारे ३०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी महाराष्ट्र शासन ६० टक्के खर्च उचलणार असून, उर्वरित खर्चात पुणे महानगरपालिका २० टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका १० टक्के आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) १० टक्के योगदान देणार आहे. यामुळे पुण्याची हवाई वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या युरोपकडे प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुंबईवर अवलंबून राहावे लागते. मात्र, पुणेहून थेट युरोपला विमानसेवा सुरू झाल्यास वेळ आणि खर्चात मोठी बचत होणार आहे.
सध्या पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, जुन्या टर्मिनलवरील उड्डाण वाहतूक पूर्णतः नव्या टर्मिनलवर हलवण्यात आली आहे. जुन्या टर्मिनलच्या पुनर्विकासाचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी शहराच्या वाढत्या गरजा ओळखून केंद्र सरकारकडून हवाई सेवा क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी त्यांनी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली. हा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल आणि पुण्यासाठी अभिमानास्पद ठरेल, असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने जागा निश्चित केली असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. देशभर प्रवास करत असलो तरी पुणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पुण्याची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे वचनबद्ध राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.