पंढरपूर – महाराष्ट्राच्या आराध्य तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये शनिवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुनिता सपकाळ आणि संगीता सपकाळ या दोन महिलांचा तसेच एका अनोळखी महिलेचा यात मृत्यू झाला.
या महिला पुंडलिक मंदिराजवळ स्नानासाठी आल्या असताना उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदीत बुडाल्या. यावेळी घटनास्थळी प्रशासनाचे जीवरक्षक उपस्थित नसल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात पाणी नदीत असतानाही आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा हजर नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिकांकडून चंद्रभागा नदीपात्रामध्ये कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याची मागणी जोर धरत आहे. पंढरपूरला दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि स्नानासाठी नदीकाठावर मोठी गर्दी होते. पाण्याचा प्रवाह किंवा खोलीचा अंदाज नसल्याने दरवर्षी अशा दुर्घटना घडत असल्याचे वारकरी सांगतात.