पुणे – देशभरातील ४५०० हून अधिक शहरांमध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या स्पर्धेत पुणे शहराने पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी सिद्ध करत देशात आठवा क्रमांक मिळवला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या या यादीत, दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याने झेप घेत सातत्यपूर्ण प्रगती दाखवली आहे.
पुण्याचा प्रवास – ३७व्या स्थानावरून ८व्या क्रमांकापर्यंत
२०१९ मध्ये ३७व्या क्रमांकावर असलेले पुणे शहर, गेल्या काही वर्षांत स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे वेगाने वर आले. २०२० मध्ये १५वे, २०२१ मध्ये पाचवे, २०२२ व २०२३ मध्ये नववे आणि यंदा ८व्या क्रमांकावर झेप घेत शहराने सातत्यपूर्ण प्रगती कायम राखली आहे.
इंदूर पुन्हा अव्वल; पुण्याचा पुढील लक्ष्य ‘टॉप ३’
या यादीत मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा अव्वल स्थान पटकावून ‘सेव्हन स्टार’ रेटिंग मिळवले आहे. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी पुढील वर्षी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महापालिकेचे प्रयत्न – यशामागचे कारण
पुणे महानगरपालिकेने गेल्या वर्षभरात १७ ई-वेस्ट कलेक्शन सेंटर्स उभारणे, ९८% कचरा वर्गीकरण, दंडात्मक कारवाई, तीन पाळ्यांतील स्वच्छता कामे, जनजागृती मोहिमा आणि महास्वच्छता अभियान अशा उपाययोजना राबवल्या. तसेच बायोमाइनिंग प्रकल्प आणि क्षेत्रीय पातळीवरील स्वच्छता स्पर्धा यंदा सुरू होणार असून, या उपक्रमांमुळे शहराची रँकिंग आणखी उंचावण्याचा आत्मविश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.