weather News ! मुंबई : महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला असून, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रापर्यंत पसरल्याने राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर महिन्यात नेहमीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला होता.

गेल्या २४ तासांत रायगड, पनवेल परिसरासह मराठवाड्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सलग न पडता अधूनमधून मुसळधार स्वरूपात होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १४ सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात यशोदा नदीला पूर आल्याने वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व चिमूर तालुक्यांत ग्रामीण रस्ते बंद झाले असून दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागला आहे.
परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची पुनर्रचना झाली आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेल्या मुग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे मुग काळवंडत असून अळ्या-किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात आले असून, पावसाने उघडीप दिली नाही तर उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
News title : Heavy Rainfall Alert in Maharashtra: Flood Situation, Crop Damage Reported