पुणे :भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भुवनेश कुमार यांनी आधारचे वेळोवेळी अद्ययावत राहणे विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विविध शैक्षणिक परीक्षा व इतर प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी आधारची माहिती अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. कुमार हे १२ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात रिझर्व्ह बँकेच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंग येथे आयोजित “केवायसी (KYC), एएमएल (AML) आणि सीएफटी (CFT)” या विषयावरील कार्यशाळेत उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांनी गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रात आधार ऑथेंटिकेशनचे महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर त्यांनी पुण्यातील माधव सदाशिव गोलवलकर शाळेत सुरू असलेल्या मेगा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) कॅम्प ला भेट दिली. येरवडा येथील जेंबा मौजे प्रशाला मध्ये मागील तीन दिवसांपासून दुसरा मेगा कॅम्प सुरू आहे. हे मेगा कॅम्प दोन किंवा अधिक शाळांच्या समूहात आयोजित केले जात आहेत. पुण्यातील या कॅम्पमध्ये एकूण ६ आधार किट्स कार्यरत आहेत, त्यापैकी ३ शालेय शिक्षण विभागाकडून आणि ३ टपाल विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शालेय मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना श्री. कुमार यांनी विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांचे आधार अपडेट राहिल्यास त्यांना परीक्षांसाठी सहज प्रमाणीकरण करता येते, असे ते म्हणाले. आधार किट ऑपरेटर तसेच शालेय शिक्षण विभाग व टपाल विभागातील अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला आणि UIDAI सोबत समन्वय साधून कॅम्प यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
UIDAI ने मिशन मोडमध्ये अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ५ ते १७ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. हा उपक्रम UDISE+ पोर्टलशी एकत्रित करण्यात आला आहे.
या अभियानात ५ ते ७ वयोगट आणि १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट मोफत केले जात आहे. तर ७ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रति अपडेट शुल्क रु.१०० आकारले जाते. UIDAI, शालेय शिक्षण विभाग (महाराष्ट्र), भारत सरकारचा टपाल विभाग तसेच महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून हे अभियान राबविले जात आहे.