पुणे,- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना नुकतेच एक जीएसटी दर कमी करून मोठे गिफ्ट दिले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे आमूलाग्र बदल घडणार आहे. २८ टक्के जीएसटी काही ठिकाणी थेट पाच टक्के पर्यंत कमी केला आहे. गरिब आणि मध्यम नागरिकांचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान यांनी केला आहे. त्यामुळे काही कोटीचा महसूल कमी होईल याची जाणीव मला आहे पण नागरिकांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. नागरिकांनी आता स्वदेशी वस्तू वापर करण्यावर भर दिला पाहिजे. देशातील पैसा परदेशात न जाता देशातच राहिला पाहिजे.२०४७ चा विकसित भारत त्यातून निर्माण होईल. यापुढे “स्वदेशी” हाच मूलमंत्र आपला सर्वांचा राहील आणि तोच आपला धर्म आहे असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ३१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाले. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी उपमहापौर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल यांनी मान्यवरांचे स्वागत केले . मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, राधा सागर, स्मिता तांबे, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांची विशेष उपस्थिती यावेळी होती.

घटस्थापनेच्या दिवशी सहकारनगर, शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.४१ मि. या शुभमुहूर्तावर विधिवत घटस्थापना करण्यात आली. या मंदिराच्या प्रांगणात यंदा मदुराई येथील ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा साकारला आहे त्याचे लोकार्पण देखील मंत्री बावनकुळे यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्यात भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन शिक्षण व संस्कार यासाठी अविरत काम करणारे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने डॉ. पराग काळकर (प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सामजिक कार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना गौरविण्यात आले. याशिवाय डॉ. मयूर कर्डिले आणि डॉ. अरविंद खोमणे यांनाही विशेष सन्मानित केले गेले.

बावनकुळे म्हणाले, अनेक वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव यशस्वीपणे आबा बागुल आणि जयश्री बागुल राबवत आहे. या धार्मिक कामाला पुढे नेण्याचा योग त्यांना आला आहे. मी नागपूर मध्ये ३५ वर्ष महालक्ष्मी देवीचा महोत्सव मध्ये कार्यरत असून प्रथमच नागपूर सोडून याकाळात पुण्यात आलो. आबा बागुल यांनी ज्याप्रकारे आपले जीवन समर्पित केले आहे ते प्रेरणादायी आहे. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात.जीवनात कोणी व्यक्ती परीपूर्ण नाही,प्रत्येकजण अनुभव मधून शिकत असतो. प्रत्येकाला परमेश्वर याने एक विशेष गुण दिला त्याचा आविष्कार आपण करत असतो. त्यामुळे एकमेकाकडून आपण अनुभवातून शिकत असतो. मनुष्याच्या जीवनात पत,प्रतिष्ठा, पैसा कधी मागे उरत नाही तर आपल्या जीवनातील काम महत्त्वपूर्ण ठरते. याठिकाणी ज्याप्रकारे नवरात्र उत्सव साजरा होत आहे तो आगामी काळात अधिक समृद्ध व्हावा. जीवनात देव, देश, धर्म यासाठी काम केले तर देश खऱ्या अर्थाने विकसित होईल. वैभवशाली विविध धार्मिक परंपरा भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरली आहे.
पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सरकार पुण्यावर विशेष लक्ष्य ठेवून आहे. मुख्यमंत्री सातत्याने पुण्यात कामानिमित्ताने येत असतात. त्यांनी सन २०२९, २०३५ आणि २०४७ मधील विकसित पुण्याचे दीर्घकालीन नियोजन केले आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक चांगले शहर पुणे होईल आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होतील असे काम सध्या सुरू आहे. पुणे मध्ये आमचे विविध नेते एकत्रित काम करत आहे. पुणे बाबत आतापर्यंत जी संकल्पना देखील केली नसेल त्यापेक्षा अधिक चांगलं काम आगामी काळात होईल.
आबा बागुल म्हणाले, पुणे नवरात्र महोत्सव मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष न पाहता आज महोत्सव मध्ये आले त्यांचे मी स्वागत करतो. बावनकुळे यांचे कार्य मोठे आहे अनेक वर्ष ते विविध काम करत आहे. धोरणात्मक निर्णय ते तातडीने मार्गी लावतात. पुण्यात वाहतूक समस्या असून त्याबाबत माझे मायक्रोप्लॅनिंग आहे त्याबाबत विचार व्हावा. मनपा मध्ये जकात बंद झाल्यावर जीएसटी आले आणि बजेट दहा हजार कोटी आणि सहा हजार कोटी जमा होत नाही अशी स्थिती आहे. एकदा ठराविक कर सर्व मनपा यांचा जमा करून त्याआधारे व्याज वापर करून विकासकामे केली जावी आणि कर्मचारी यांचा सुयोग्य वापर करावा.

उद्घाटन सोहळा दरवर्षी प्रमाणे भव्य आणि नेत्रदीपक करण्यात आला. यामध्ये सितार, व्हायोलिन, बासरी व तबला यांची जुगलबंदी असणारा ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर आणि माधवी करंदीकर व ग्रुप यांनी सादर केला. नृत्यगुरु पं. शमा भाटे व सहकारी ‘शरण्ये रुद्र चंडिके’ कथ्थक हा कार्यक्रम सादर केला. विनोद धोकटे, स्वाती धोकटे व सहकलाकार ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ हा कार्यक्रम सादर केला. उद्घाटन सोहळ्याचा आकर्षण ठरणारा मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, राधा सागर, स्मिता तांबे, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर घनश्याम सावंत यांनी आभार व्यक्त केले