पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी व समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. याच अनुषंगाने तृतीयपंथी घटकांना चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेला स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे तृतीयपंथी घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
स्थायी समिती बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमध्ये शून्य कचरा प्रकल्प, स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ ची पूर्वतयारी साठी प्रॉडक्शन मॅनेजमेंट कामकाज खर्चास मान्यता देणे, यशवंतराव स्मृती रुग्णालय येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करणेबाबत व त्या संदर्भातील शैक्षणिक शुल्क महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांना अदा करणे, ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पद्धतीने करणे या कामास मुद्तवाढ देणे, नवीन जिजामाता रुग्णालय येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडील नोंदणीसाठी केलेल्या अर्जाची कंन्सेन्ट ऑथरायझेशन फी व तपासणीनंतर महामंडळाकडून कळविलेल्या पेनल चार्जेस भरणे, नवीन जिजामाता रुग्णालयासाठी लिथियम पॉलिमर बॅटरी साहित्य खरेदी करणे, प्रभाग क्रमांक २ कुदळवाडी परिसरातील डीपी रस्ते विकसित करण्यासाठी चालू विकास कामांच्या सुधारित अंदाजपत्रकात मान्यता देणे, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात महापालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी डुडूळगाव येथे निवासी गाळे बांधणे यासह विविध ३९ विषयांना मान्यता देण्यात आली.
याशिवाय स्थायी समिती अधिकारांतर्गत मा. प्रशासक यांच्याकडील ठराव महापालिका सी एस आर अंतर्गत नोंदणी करण्यास मान्यता देणे, तृतीयपंथी घटकांना चार चाकी हलके वाहन चालविण्याच्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजना राबविणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.