पुणे – : गुरु व शिष्य यांनी एकाच वेळी पदकांच्या व्यासपीठावर उभे राहण्याचा दुर्मिळ योग येथे नुकताच पहावयास मिळाला. निमित्त होते महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग अजिंक्यपद स्पर्धा. या स्पर्धेमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी सुवर्ण चौकारांसह आठ पदकांची कमाई केली. त्याचबरोबर त्यांच्या प्रशिक्षकांनीही तीन सुवर्णपदके जिंकून चमकदार कामगिरी केली
श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये निया पतंगे हिने २०० बाय फिन, २०० मोनो फिन व १०० मोनो फिन प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर १०० बाय फिन प्रकारात तिला कांस्यपदक मिळाले. रेवा चौगुले हिने ५० अपनिया व २०० मोनोफिन प्रकारात रौप्यपदक मिळविले तर १०० मोनोफिन प्रकारात कांस्यपदक जिंकले. अनया वानखेडे हिने ५० बाय फिन प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूंना प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रुपाली अनाप आणि केशव हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षक श्रीमती स्मिता काटवे यांनी या स्पर्धेत ५० मीटर बाय फिन, १०० मीटर बाय फिन, ५० मीटर सरफेस मोनो फिन या तीनही क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली.
खेळाडू व प्रशिक्षकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.