घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप, लालित्यपूर्ण पदन्यास, सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे ‘वन्स मोअर’चे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’त रविवारी दुपारी १२ पासून सलग १२ तासांचा ‘लावणी धमाका’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित केला गेला. “महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज ‘लावणी महोत्सव’ पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३१ वर्षांपूर्वी सुरू केला. गेली ३१ वर्षे त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो,” असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.

विक्रमी लावणी महोत्सवात सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर (पाव्हनं फक्त तुमच्यासाठी), रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रील स्टार कुकू, वर्षा मुंबईकर (लावणी सुपरस्टार), सिनेतारका अर्चना सावंत, ज्योती मुंबईकर (मदनाची मंजिरी), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी कै. लता मंगेशकर यांच्या २८ सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्रास आबा बागुल यांच्यासमवेत लावणी कलावंतांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लावणी महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात गण-गवळण व मुजऱ्याने झाली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्याविष्कार सादर करून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री गणेश कला-क्रीडा रंगमंचाचे प्रेक्षागृह दुपारी १२पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्या व नृत्य करून लावणीला ‘वन्स मोअर’ची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता.

‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हनत्यात हो पुण्याची मैना’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
‘विचार काय आहे तुमचा पाहुनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आजकाल पाटलाचा’, ’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनि अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गवळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.
याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’ या लावणीने ‘वन्स मोअर’ची दाद मिळविली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यांसह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका उर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूनि गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या लावण्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग १२ तास नृत्यांगनांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंत कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.