मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या बारावी (HSC) आणि दहावी (SSC) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मंडळाचे मुख्यालय पुणे येथे असून नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि नंदूरबार या नऊ विभागांमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
बारावा परीक्षेचे वेळापत्रक – बारावीची परीक्षा (लेखी) १० फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत होईल. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षाही या काळातच घेतल्या जाणार आहेत. तसंच दहावीची परीक्षा (लेखी) परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत पार पडणार आहे.
प्रयोग परीक्षेचे वेळापत्रकही ठरले – लेखी परीक्षांसोबतच प्रायोगिक, श्रेणी, मौखिक व आंतरिक मूल्यमापन परीक्षा सुद्धा निश्चित केल्या गेल्या आहेत. बारावीकरता या परीक्षा २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान तर दहावीकरिता २ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहेत. बारावीकरता माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांचा प्रायोगिक भाग असेल, तर दहावीकरता शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांचा समावेश असेल.
अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे निर्देश – मंडळानं शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नियोजनासाठी या तारखा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकृत व तपशीलवार विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोंफणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा तयारीसाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले आहे.