41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
HomeTop Five Newsउन्हाळी हंगामात एसटी प्रवासाला महागाईची झळ

उन्हाळी हंगामात एसटी प्रवासाला महागाईची झळ

१५ एप्रिलपासून नवीन दर लागू

ST BUS NEWS | मुंबई/पुणे  : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम जवळ येत असताना राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांना आर्थिक झटका देणारा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून एसटीच्या तिकिटांवर १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात येणार (ST BUS) असून, त्यासोबतच प्रति तिकिट दोन रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

महामंडळाच्या माहितीनुसार, ही १० टक्क्यांची भाडेवाढ केवळ दोन महिन्यांसाठी म्हणजेच १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लागू राहणार आहे. मात्र, स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे. एसटी स्थानके, आगार आणि बसगाड्यांची स्वच्छता राखण्यासाठी हा अतिरिक्त निधी वापरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ही दरवाढ प्रामुख्याने साध्या बसगाड्यांवर लागू होणार आहे. यामध्ये ‘लाल परी’, मिडी बस, जलद सेवा आणि रात्रसेवा बसांचा समावेश आहे. सुधारित दरांनुसार, प्रौढ प्रवाशांसाठी प्रति टप्पा १२ रुपये, तर लहान मुलांसाठी ७ रुपये भाडे आकारले जाणार आहे. मात्र, शिवनेरी, शिवशाही, जनशिवनेरी, हिरकणी, शयनयान आणि ई-बस या प्रीमियम सेवांना या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक तसेच इतर सवलतधारक प्रवाशांना स्वच्छता अधिभारातून सूट देण्यात आली आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार किंवा सात दिवसांचा पास घेणाऱ्या प्रवाशांकडून मात्र पाच रुपयांचा अधिभार आकारला जाणार आहे. आगाऊ आरक्षण केलेल्या पासधारकांना या अधिभारातून दिलासा देण्यात आला आहे.

एसटीच्या बसगाड्या भाडेतत्त्वावर घेणाऱ्यांनाही नवीन नियम लागू होणार असून, प्रत्येक बसमागे ५० रुपयांचा अतिरिक्त अधिभार भरावा लागणार आहे. या बदलांमुळे विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ९० ते १०० रुपयांपर्यंत अधिक खर्च येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसटी महामंडळाला गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपात भाडेवाढ करण्याची परवानगी आहे. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात जाहीर करण्यात आलेली १० टक्के भाडेवाढ प्रवाशांच्या तीव्र विरोधानंतर मागे घ्यावी लागली होती. त्यामुळे यंदाच्या निर्णयावर प्रवाशांकडून काय प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्याने, महसूल वाढविणे आणि सेवा सुधारणा या दुहेरी उद्दिष्टांसाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. तथापि, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या खिशावर याचा अतिरिक्त ताण पडणार हेही तितकेच खरे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments