१ नोव्हेंबरपासून देशभरात तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे सात नवे नियम लागू झाले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार आणि बँकिंग क्षेत्राकडून काही नवे निर्णय अमलात येतात, आणि यावेळी देखील त्याला अपवाद नाही. आधार कार्ड, बँक खाते, पेन्शन योजना आणि जीएसटीशी संबंधित काही महत्वाचे बदल आजपासून लागू झाले असून, या सर्वांचा थेट परिणाम नागरिकांच्या कमाई, बचत आणि व्यवहारांवर होणार आहे.
नागरिकांनी हे नवे नियम वेळेत समजून घेणं अत्यावश्यक आहे, अन्यथा आर्थिक व्यवहारात अडथळे किंवा अतिरिक्त शुल्काचा फटका बसू शकतो. चला पाहूया, कोणते आहेत हे महत्वाचे बदल आणि त्यांचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे —
🔹 आधार कार्ड अपडेट मोफत
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मोठा दिलासा दिला आहे. मुलांच्या आधार कार्डसाठी लागणारी ₹125 बायोमेट्रिक अपडेट फी रद्द करण्यात आली आहे. पुढील एक वर्ष ही सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
प्रौढांसाठी नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ₹75 फी लागू राहील, तर फिंगरप्रिंट किंवा आयरिस अपडेटसाठी ₹125 आकारले जातील.
🔹 बँक खातेदारांसाठी नवीन नामांकन नियम
रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक खात्यांशी संबंधित नवा नियम जाहीर केला आहे. आता एका बँक खात्यास, लॉकरला किंवा सेफ डिपॉझिट अकाउंटला जास्तीत जास्त चार लोकांपर्यंत नामांकन करता येणार आहे.
या बदलामुळे आकस्मिक परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना निधी सहज उपलब्ध होईल आणि वारसाहक्कासंदर्भातील वाद टळतील.
🔹 जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल
सरकारने कररचनेत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दोन-स्लॅब जीएसटी प्रणाली लागू झाली आहे.
आधीच्या ५%, १२%, १८% आणि २८% या चार स्लॅबऐवजी आता फक्त ५% आणि १८% या दोनच स्लॅब लागू राहतील.
लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर ४०% पर्यंत कर आकारला जाणार आहे. या बदलामुळे सामान्य ग्राहकांच्या दैनंदिन वस्तूंवरील करभार कमी होण्याची शक्यता आहे.
🔹 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची मुदतवाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मधून युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मध्ये स्थलांतर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी वार्षिक लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबरअखेरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये उशीर झाल्यास पेन्शन थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔹 पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकर फीमध्ये बदल
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या लॉकर शुल्कात बदल जाहीर केला आहे.
नवीन फी स्ट्रक्चर लॉकरच्या आकार आणि ग्राहकांच्या वर्गीकरणावर (कॅटेगरी) अवलंबून असेल. हा बदल अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर ३० दिवसांनी लागू होईल.
🔹 एसबीआय कार्डवरील नवे शुल्क
एसबीआय कार्ड वापरणाऱ्यांसाठीही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मोबिक्विक किंवा क्रेड सारख्या थर्ड-पार्टी अॅप्सद्वारे करण्यात येणाऱ्या शैक्षणिक व्यवहारांवर आता १% शुल्क आकारले जाणार आहे.
याशिवाय, डिजिटल वॉलेटमध्ये ₹1,000 पेक्षा जास्त रक्कम भरल्यासही १% चार्ज लागू होईल.
🔹 आर्थिक शिस्त पाळा, अन्यथा तोटा होऊ शकतो
या सर्व बदलांचा थेट संबंध तुमच्या बँकिंग, आधार, पेन्शन आणि व्यवहार व्यवस्थेशी आहे. त्यामुळे वेळेत माहिती अद्ययावत करणं आणि नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात किंवा अतिरिक्त आर्थिक दंड भरावा लागू शकतो.
१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या नव्या नियमांमुळे देशात आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुव्यवस्थित होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी मात्र वेळेत माहिती अद्ययावत करून आपले खाते आणि कागदपत्रे नियमित ठेवावीत, म्हणजे भविष्यातील गैरसोयी टाळता येतील.


