५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन…त्यानिमित्त सोलापुरात एक आगळा वेगळा कार्यक्रम होणार आहे.
जयवन्त दळवी यांची जन्मशताब्दी सध्या सुरु आहे. त्यानिमित्ताने जयवन्त दळवी यांच्या काही नाटकांच्या प्रवेशाचे अभिवाचन होणार आहे.
नाटक हा मराठी रसिकांच्या मनातला एक हळवा कोपरा आहे. मराठी नाटकाला प्रदीर्घ अशी गौरवशाली परंपरा आहे.
केवळ रंजनासाठीच नाही, तर लोक जागृतीसाठीसुद्धा महात्मा जोतिराव फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल यांनी नाटकाचा मोठ्या चातुर्याने उपयोग केला.
विषय, आशय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत या सगळयांत बदल होत गेले.
सोलापूरातही नाट्य चळवळ जोमाने रुजली आहे.
अनेक उत्तम कलाकार सोलापूरच्या भूमीने रंगभूमीला दिले आहेत.

रंग संवाद प्रतिष्ठान जुळे सोलापूरात कार्यरत आहे.
अनेक कलाकार घडवण्याचे काम रंग संवाद प्रतिष्ठान, नाट्य परिषद या अनेक नाट्य संस्था करत आहेत.
रंग संवाद प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष तथा
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मीरा शेंडगे आणि लेखिका, निवेदिका मंजुषा गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
या अभिवाचनामध्ये सोलापुरातील काही अनुभवी नाट्यकर्मी तसेच काही नव्या पिढीतील नाट्यकर्मी हे अभिवाचन सादर करणार आहेत.
जयवंत दळवी नुसते लेखक नव्हते तर उत्तम नाटककार होते. काळाच्या पुढचा आणि धाडसी विचार दळवी यांनी आपल्या नाटकातून मांडला.
बॅरिस्टर, संध्या छाया, सावित्री, पुरुष, लग्न ही जयवंत दळवी यांची काही गाजलेली नाटके.
जयवंत दळवी यांच्या साहीत्यातून, नाटकातून सतत दिसून येणाऱ्या लैंगिकतेशी संबंधित आशयसूत्रांचा संबंध माणसांच्या आदिम प्रेरणांशी निगडित आहे, असे समीक्षक मानतात.
जयवंत दळवी हे चतुरस्त्र प्रतिभेचे आणि लोकशाहीवादी साहित्यिक होते.
जयवंत दळवी यांच्या नाटकातून लैंगिकतेतून विकारवश झालेली माणसे जास्त आढळतात.
नाटकातील स्त्रिया टोकाचा मानसिक ताण सहन करूनही वेड्या होत नाहीत. पुरुष मात्र वेडाचे टोक गाठतात.
त्या काळात एवढ्या धीटपणे आणि गंभीरपणे स्त्री-पुरुष संबंधावर लिहिणारा दुसरा लेखक नव्हता असे डॉ. संजय कळमकर यांनी म्हणलं आहे.
दळवी यांच्या नाटकातील काही पात्रे मानसिक अतृप्तीने पछाडलेली असतात. माणसाची सुख दुःखे कामप्रेरणांशी निगडित असतात.
जयवंत दळवी यांच्या नाट्य विश्वाला मानवी तृष्णेचे संदर्भ आहेत. डॉक्टर महेश केळूसकर यांनी म्हटले आहे.
जयवंत दळवी यांच्या लेखन
गुणांमुळे आणि दिग्दर्शकाच्या परिणामकारक शैलीमुळे जयवंत दळवी यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. असे प्रेमानंद गजवी यांनी म्हटले आहे.
पुरुष या चाळीस वर्षांपूर्वी गाजलेल्या नाटकाचे प्रयोग आजही कलाकारांच्या नवीन संचात सुरू आहेत.
माणसाच्या आयुष्यात कितीतरी भाग बीभत्स, भयप्रद, दुःखद असतो. जे बीभत्स आहे ते झाकून ठेवायचं आणि जे गोंडस, सुंदर आहे तेवढेच लोकांसमोर आणायचं. हे दळवींना मुळीच मान्य नव्हतं.
त्यामुळे माणसाच्या आयुष्यातील सगळी भयप्रदता आणि बीभत्सता दळवी यांनी त्यांच्या साहित्यात,नाटकात चित्रित केली.
दळवींच्या साहित्याचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते की त्यांनी कधीही परकीय बीजावरून आपली साहित्य कृती बेतली नाही.
” सभ्य गृहस्थ हो ” हे त्यांचे पहिलं विनोदी नाटक याच नावाच्या एका विनोदी कथेवर आधारलेलं आहे.
जयवंत दळवी यांचं साहित्य वाचताना, त्यांची नाटके आजही पाहताना लक्षात येते की जयवंत दळवी हे कालातीत नाटककार आहेत.
काळाच्या पुढचा विचार त्यांनी आपल्या नाटकातून मांडला आहे.
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने, त्यांच्या निवडक नाटकांच्या प्रवेशाचे अभिवाचन ५ पाच नोव्हेंबर रंगभूमी दिना दिवशी सोलापुरात होत आहे.
नाट्य रसिकांनी त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.

- -श्रीधर मधुकर खेडगीकर(सोलापूर) 9423536084
 


