पुणे- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. धाराशिव येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलताना, “राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडतो तशी राष्ट्रवादीची अस्वस्था आहे” अशी टीका आमदार तानाजी सावंत यांनी केली. यावरून महायुतीत नवा वाद रंगला आहे.
आमदार तानाजी सावंत मंत्रिपद नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीधर्माबद्दल उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा एक डोस स्वतः प्यावा म्हणजे युती धर्मात मिठाचा खडा पडणार नाही. असा टीकात्मक खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी सावंतांना दिला आहे.
रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं मंत्रिपद का काढून घेतलं? याच आत्मचिंतन सावंत यांनी करावं. महायुतीत एकत्र असताना महायुतीचे संस्कार पाळायचे नाही, मित्रपक्षावर पातळी सोडून टीका करत रहायची अशा कारणामुळेच त्यांना मंत्रिपद नाही. हे त्यांना अजून समजत नसेल तर मग अवघड आहे. महायुतीत असतानाही मित्रपक्षावर टीका केल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण तयार होत आहे.
तानाजी सावंत यांनी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना भान ठेवून आणि जबाबदारीने बोलावे अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. जशास तसं प्रत्युत्तर देताना संकोच बाळगला जाणार नाही असा इशाराही सुरवसे-पाटील यांनी दिला.


