14.1 C
New Delhi
Friday, November 21, 2025
HomeTop Five Newsशिवसेना-पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह

शिवसेना-पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

पुणे: हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत आणि जिवंत ठेवणाऱ्या काही मोजक्या संघटना उरल्या त्यामध्ये पतित पावन संघटनेचे फार मोठे काम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्यासाठी झाला आहे. शिवसेना आणि पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह आज एकत्र आलेले आहेत. हिंदुत्वाच्या दृष्टीने हा अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

अखंड हिंदुत्ववादासाठी शिवसेना व पतित पावन संघटनेचा एकजूट मेळावा कार्यक्रम कर्वेनगर परिसरात उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास प्रारंभ झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, नीलेश गिरमे, पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के, प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, राजाभाऊ पाटील, पुणे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजीव सलगर, शहर पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, सरचिटणीस जालिंदर टेमघरे, नीलेश जोशी, अरविंद परदेशी, तेजस पाबळे, प्रशांत कुरुमकर, विजय गावडे, सुनील मराठे, गणेश जाधव, शरद देशमुख, सौरभ कुलकर्णी, राजाभाऊ बर्गे, राहुल पडवळ, शुभम परदेशी, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “खरे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच हिंदू धर्म या शब्दाला हिंदुत्व हा शब्द वापरला हिंदुत्व म्हणजे एक हिंदू जीवन पद्धतीचे सार. ते व्यापक आहे आणि म्हणून सावरकरांच्या मते हिंदुत्व एक राजकीय आणि सांस्कृतिक ओळख असली तरी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यावर त्यांचा विशेष लक्ष होते. जो हिंदुत्व विसरला तो स्वत्व विसरला. जो स्वत्व विसरला तो देश विसरला. जो देश विसरला तो अस्तित्व विसरला आणि जो अस्तित्व विसरला तो मेला. आपली विचारधारा जी आहे ती जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे. शिवसेनेने अनेक मित्र जोडले. पण आज होत असलेली जी मैत्री आणि युती आहे ही एकदम वेगळी आहे. दोन्ही विचारधारा सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणाऱ्या आहेत.”

ते म्हणाले ” पतित पावन संघटना गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार आणि प्रसार करत आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रभक्तीचे मूल्य रुजवण्याचे काम संघटनेने केले. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशांमध्ये व्यापक हिंदुत्वाची हाक दिली. गर्वसे कहो, हम हिंदू आहे हा नारा बुलंद करण्याचे काम केले आहे. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न कोणी केला तर सडेतोड उत्तर बाळासाहेबांनी दिले आणि पतित पावन संघटनेने पण दिले. आणि म्हणून शिवसेना आणि पतित पावन संघटना आज एका व्यासपीठावरून एका छताखाली आपण आलेलो आहोत. प्रत्येक देशभक्ताला आज याचा अभिमान वाटेल.”

शिंदे म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालीमीमध्ये तयार झालेले आपण कार्यकर्ते आहोत आणि त्यांची जी शिकवण आहे ती पुढे घेऊन चाललोय. ज्यावेळी हिंदुत्व अडचणीत आले आणि ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व सोडून इतर विचारधारेची जोडणी होऊ लागली, जे बाळासाहेबांना नको होते ते जेव्हा होऊ लागले त्यावेळेस मात्र या एकनाथ शिंदेने आणि आमच्या सहकाऱ्यांनी उठाव केला. हिंदूत्ववादी सरकार या राज्यात आणले.

शिंदे म्हणाले ”लाडकी बहिण योजना सर्वात लोकप्रिय आहे. बंद होणार नाही कारण शेवटी जीवनामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शब्दाला महत्व असते. त्यामुळे जे शब्द आम्ही दिले ते शब्द पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार. काही लोक म्हणतात निवडणुकीमध्ये आश्वासने द्यायची असतात, परंतु आम्ही तसे नाही. बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून आपले काम आहे. खुर्ची दिसली की आम्ही रंग बदलत नाही. असे जे लोक त्यांचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.”

सोपानराव देशमुख यांनी सांगितले की पतितपावन संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार करते. आग लावण्यापासून आग शमवण्यापर्यंत काम करते.संघटना आणि शिवसेना हातात हात घालून काम करत राहिल.

सुधीर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पतितपावन संघटनेचा जयजयकार, एकनाथ शिंदे यांचा जयघोष करत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मेळाव्यात हजर होत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
14.1 ° C
14.1 °
14.1 °
88 %
0kmh
0 %
Fri
27 °
Sat
27 °
Sun
26 °
Mon
26 °
Tue
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!