पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवून आणणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या केंद्र सरकारतर्फे पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (PMPML) तब्बल १००० नव्या इलेक्ट्रिक बस मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या बस टप्प्याटप्प्याने शहरात दाखल होत सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल अपेक्षित आहे. सध्या वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवाशांचा वाढता ताण हा मोठा प्रश्न बनला आहे. ई-बसच्या समावेशामुळे फक्त वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर शहरातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार असून पुणे अधिक हरित आणि स्वच्छ शहराच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
या मंजुरीसाठी मागील काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान सातत्याने समन्वय साधण्यात आला. प्रस्तावाच्या तांत्रिक तपशीलांची पूर्तता, आर्थिक तरतुदींच्या मंजुऱ्या, रिझर्व्ह बँकेमार्फत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तसेच केंद्राला सादर करण्यात आलेल्या कारणमीमांसा अहवालावर उच्चस्तरीय बैठका झाले. नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रस्तावाला गती देण्याची जबाबदारी पार पाडण्यात आली आणि अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले.
सध्या पुण्यात ३२ किमी मेट्रो मार्ग कार्यरत आहे, तर शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो मार्ग प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मेट्रो आणि ई-बस या दोन्हीचा एकमेकांशी जोडलेला बहुमाध्यमी वाहतूक (Multimodal Transport) मॉडेल उभा राहत आहे. यामुळे नागरिकांना घरापासून गंतव्यस्थळापर्यंत अखंड, सुटसुटीत आणि वेळेवर प्रवासाचा लाभ मिळेल.
ई-बस ताफा वाढल्यामुळे पुढील काही वर्षांत
- डिझेल वाहने कमी होणार
- इंधन खर्चात मोठी बचत होणार
- सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक होणार
- खाजगी वाहनांवरील अवलंबन कमी होणार
“१००० ई-बस मंजुरी हा केवळ वाहतूक सुधारण्याचा निर्णय नसून पुण्याच्या भविष्यासाठी घडवून आणलेला हरित आणि सस्टेनेबल विकासाचा मजबूत पाया आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासव्यवस्था उभी करण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा आहे. या उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार.”
— मुरलीधर मोहोळ(केंद्रीय मंत्री)


