Election News | पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.
महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले सभागृह येथे मुख्यालय स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजाचे स्वरूप आणि प्रक्रिया याबद्दल सावित्रीबाई फुले सभागृह येथे माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जांभळे पाटील बोलत होते.
निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महापालिकेचे सहायक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, किरणकुमार मोरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कार्यालय अधीक्षक रमेश यादव यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीची माहिती देण्यात आली. यामधील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित पद्धतीने हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसारच हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार असून, नजीकच्या प्रभाग कार्यालयात अथवा सावित्रीबाई फुले सभागृहातील कक्षामध्ये या हरकती व सूचना १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवसांसह सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वा सहा यावेळेत स्वीकारल्या जातील. तर, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकत आणि सूचना स्वीकारल्या जातील.


