पुणे -: सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी (एसव्हीयू) सातत्याने इंडियन नॉलेज सिस्टम्स म्हणजेच भारतीय ज्ञान प्रणालींवर विशेष भर देत भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देत आहे. क. जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीजअंतर्गत या विद्यापीठातर्फे योगशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र, प्राचीन भाषा आणि साहित्य आणि धर्मविषयक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २१ व्या शतकातील बौद्धिक ज्ञानाची आस पूर्ण करतानाच भारताच्या प्राचीन ज्ञान पद्धतींची मुळे जपणारा सर्वसमावेशक अभ्यासक्रम यातून तयार झाला आहे.
भारतीय ज्ञान प्रणालीतील संशोधन आणि शिक्षक प्रशिक्षण मंत्रालयाने प्रमाणित केलेले हे विद्यापीठ भारतातील काही निवडक केंद्रापैकी एक आहे जिथे संस्कृत, पाली, प्राकृत, हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासाला समकालीन संशोधन पद्धतींची जोड देण्यात आली आहे. तत्त्वज्ञान, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, आरोग्य विज्ञान आणि सांस्कृतिक इतिहास अशा विविध क्षेत्रातील दृष्टिकोन यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पनांचे मूळ अभ्यासता येते आणि त्याचवेळी भारतीय आणि जागतिक विचारप्रणाली घडवणाऱ्या पद्धती समजून घेता येतात.
योगशास्त्र अभ्यासक्रमात ही पद्धती अधिक व्यापक स्वरुपात दिसून येते ज्यात योग तत्त्वज्ञानासोबतच मानसिक आणि शारीरिक आरोग्य,सर्वांगीण विकास या बरोबरीनेच आधुनिक मानसशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र इत्यादींची जोड दिली जाते. उपनिषदे, योगसूत्रे, हठप्रदीपिका इत्यादी पारंपरिक साहित्यासोबतच यात आधुनिक उपचारात्मक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही समजावला जातो. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या अभ्यासक्रमात भारताच्या मूर्त वारशाचा अभ्यास केला जातो. पुरातत्त्वशास्त्राशी संबंधित प्रत्यक्ष भेटी, संग्रहालयांतील इंटर्नशीप तसेच अजिंठा-वेरुळ, कान्हेरी आणि चौल येथील अभ्यास सहली अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेत येतो. पुरातन भाषा आणि साहित्य अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना संस्कृत, पाली, प्राकृत आणि तिबेटी भाषांच्या प्रशिक्षणासह व्याकरण, भाषिक परंपरा आणि हस्तलिखिते यांचा सखोल अभ्यास शिकवला जातो.
या संस्थेत सन्माननीय दलाई लामा चेअर फॉर नालंदा स्टडीज आहे. या उपक्रमासाठी दलाई लामा यांनी त्यांच्या नोबेल पारितोषिकाच्या रकमेतील काही भाग गुंतवला आहे. यातून बौद्ध तत्वज्ञान आणि आंतरधर्मीय संवादासाठीची शिष्यवृत्ती दिली जाते. गोदरेज आर्काइव्ह्ज, कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ हेरिटेज, तेलंगणा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना डाक्युमेंटेशन प्रोजेक्ट, संशोधनाशी संबंधित परिषदा आणि सांस्कृतिक देवघेवीस चालना देणा-या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
“प्राचीन भारतीय ज्ञानशाखा म्हणजे भूतकाळाचे अवशेष नाहीत, तर जिज्ञासा, मूल्ये आणि सर्वांगीण विकासाचे जागृत प्रवाह आहेत”, असे धर्मशाखेचे अधिष्ठाता डॉ. अभिषेक घोष म्हणाले. “या ज्ञानाची समीक्षात्मक चिकित्सा करण्यासाठी आणि या शाखांची आधुनिक विज्ञान, जागतिक शिक्षण आणि शाश्वत विकास यांच्याशी सांगड घालण्यासाठी विद्वानांना प्रशिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे”, असेही ते म्हणाले.
४० हून अधिक शैक्षणिक अभ्यासक्रम, २० बहुविभागीय मायनर्स प्रोग्रॅम तसेच इजिप्त, ऑस्ट्रिया, मेक्सिको, युके अशा देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह या संस्थेत जागतिक शिक्षण आणि सांस्कृतिक संवादासाठी सुयोग्य परिसंस्था निर्माण करण्यात आली आहे. संशोधनासाठीचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष स्थळी जाऊन शिक्षण घेणे तसेच जेतवन कम्युनिटी प्रोजेक्ट आणि जश्न-ए-इतिहास हा सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांचाही विद्यार्थ्यांना फायदा होतो. या उपक्रमांतून भारतातील बौद्धिक आणि आध्यात्मिक वैविध्य साजरे केले जाते.
पारंपरिक शिक्षण पद्धतींच्या जोडीला डिजिटल साधने आणि संशोधनावर भर देणाऱ्या पद्धती याद्वारे सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी सातत्याने भारतीय ज्ञान प्रणालीच्या अध्ययनास आकार देण्याचे कार्य भविष्यातही करत राहील. आपल्या विविध अभ्यासक्रमांमधून भारतातील प्राचीन ज्ञान जगासमोर आणण्यासोबतच झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक शैक्षणिक समुदायाशी सुसंगत संवाद साधण्याकरिताही संस्था प्रयत्नशील आहे.


