खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता; विजेत्यांचा गौरव
पुणे, : ‘लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून ४४ हजार खेळाडू मैदानात उतरतात, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूच उत्तम आरोग्य घडत असते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केले. त्याने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खेळाला महत्त्व दिल्याबद्दल अभिनंदनही केले.

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे समारोप झाला. मुरलीधर मोहोळ यांनी भारतमातेची प्रतिमा देऊन अक्षयकुमारचा सत्कार केला. या कार्यक्रमात विजेत्या चार हजार खेळाडूंना गौरविण्यात आले. अक्षय कुमार यांनी लहान खेळाडूंशी संवादही साधला. अक्षय कुमार आणि खासदार मुरलीधर मोहोळ सायकल चालवत व्यासपीठाजवळ आले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, खेलरत्न पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, मुख्य समन्वयक मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त टेनिसपटू नितीन कीर्तने, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार या आजी-माजी खेळाडूंसह प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, सचिन भोसले, श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांना खेळासाठी पाठिंबा द्या
अक्षय कुमार म्हणाला, ‘खेळाडूंआधी पालकांचे आभार. त्यांनी मुलांना खेळासाठी पाठिंबा दिला. माझे वडील मला नेहमी म्हणायचे. सकाळी लवकर उठ, रात्री लवकर झोप. तो मंत्र मी आजही पाळला आहे. उत्तम आरोग्य सर्वांत जास्त गरजेचे आहे.’ या वेळी ४४ हजार खेळाडू क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. पुढच्या वर्षी एक लाख खेळाडूंचा यात सहभाग असायला हवा, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील क्रीडा संस्कृती वाढवायची : मोहोळ
खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘विकसीत भारत हा बलवान असला पाहिजे. त्यासाठी फिट इंडिया, क्रीडा महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ३७ क्रीडा प्रकारांत २९ ठिकाणी स्पर्धा घेतल्या. यात ४४ हजार खेळाडू सहभागी झाले. याबाबत सर्व खेळाडू, संघटनांचे आभार. पुण्याला क्रीडा संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे. ते समृद्ध करणे. ते वाढवणे हा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश होता. या स्पर्धांमधून आणि तुमच्यातूनच भविष्यातील अंजली भागवत, शांताराम जाधव होतील. आज शहराचे नेतृत्व केले, उद्या राज्याच्या नेतृत्व कराल, देशाचे नेतृत्व कराल.’ हा जगन्नाथाचा रथ ओढवून नेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे, असे सांगायलाही मोहोळ विसरले नाहीत.
पंच परिवर्तनामुळे वैभव
अंजली भागवत म्हणाल्या, ‘तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला चांगले व्यासपीठ मिळत आहेत. आम्हाला असे व्यासपीठच मिळायचे नाहीत. दर दिवशी स्पर्धेची तयारी कराल, तेव्हा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकाल. दर वर्षी या स्पर्धा व्हाव्यात, अशी माझी इच्छा आहे. पुण्यातूनच आपल्याला जास्तीत जास्त अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कारप्राप्त खेळाडू घडवायचे आहेत.’
डॉ. प्रवीण दबडघाव म्हणाले, ‘खेळ हा आनंद देणारा असतो. खेळामुळे सर्व जण एकत्र येतात. विषमता घालवायची असले, तर खेळ हे उत्तम व्यासपीठ आहे. खेळामुळे एक कुटुंब तयार होते. खेळात आपण पर्यावरणाचाही विचार करीत असतो. स्वदेशीचा विचार करीत असतो. नागरिक शिष्टाचाराचा विचार करीत असतो. या सर्व गोष्टी भारताला जागतिक स्तरावर अव्वल होण्यासाठी महत्त्वाच्या असतात. याला पंच परिवर्तन म्हणतात. हे देशाला वैभव मिळवून देऊ. आणि हे खेळातूच येते.’
पुण्यातील कौशल्यावर चर्चा
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘२०१४ पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांचा आग्रह धरला होता. त्यांनी कला, क्रीडा, शेती, नवीन तंत्रज्ञान असे चार प्रकारचे महोत्सव सुचवले होते. मोहोळ यांनी क्रीडा महोत्सवाला सुरुवात केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कुठेही गडबड झाली नाही. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा झाल्या. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन.’ सरकार खेळाबाबत मोठे निर्णय घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे; त्याचबरोबर नोकरीही द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर खेळाडू निर्माण व्हावे, यासाठीच हा उपक्रम आहे. या यशावर थांबू नका. आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजवायचे आहे. पुण्यातील कौशल्य जागतिक स्तरावर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


