पुणे पुस्तक महोत्सवा अंतर्गत ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात साडेसात लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा विक्रमी सहभाग
पुणे : वाचनाची चळवळ सक्षम करण्यासोबतच पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुस्तक वाचन करून, छायाचित्र अपलोड करीत विश्वविक्रमाकडे वाटचाल केली. सकाळी ११ ते दुपारी १२ या तासाभरात ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पुस्तक वाचन करून आपले छायाचित्र वेबसाइटवर अपलोड केले. या वाचन उत्सवात १७ ते २२ वयोगटातील युवकांची संख्या सर्वाधिक होती. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या काही हजारांनी अधिक होती. आता हा उपक्रम केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने पुणे पुस्तक महोत्सव २०२५ येत्या १३ ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. वाचन संस्कृतीचा कुंभमेळा म्हणून सुपरिचित अशा या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम मंगळवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मेट्रो, धार्मिकस्थळे, सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय, मदरसे, बसथांबे, पुणे महानगरपालिकेची कार्यालये, जिल्हा प्रशासनाची कार्यालये, सरकारी आणि खाजगी आस्थापने, रिक्षाथांबे, आयटी कंपन्या, उद्योग, सामाजिक संस्था, संघटनांची कार्यालये अशा सर्वच ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे आवडीची पुस्तके वाचत होते. नागरिकांनी पुस्तक वाचतानाचे छायाचित्र काढून ते पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत तयार केलेल्या लिंकवर अपलोड केले.

या उपक्रमात सकाळी ११ ते १२ या वेळेत ७० हजार २३८ हजार नागरिकांनी लिंकवर आपले छायाचित्र अपलोड केले आहे. त्यामध्ये ३६ हजार ५२३ महिला असून, पुरुषांची संख्या ३३ हजार ७१५ आहे. त्यामुळे पुस्तक वाचनात महिलांनी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. आता सर्वांनी अपलोड केलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हे वाक्य तयार करून त्याचा ‘गीनेस बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात येणार आहे. या विश्वविक्रमासाठी कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांचे पाठबळ लाभले असून त्यांच्याकडून आवश्यक ती मदत करण्यात येत आहे, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
….

विधिमंडळ अधिवेशनातही पुस्तक वाचन
नागपुरात विधिमंडळ अधिवेशन सुरू असून, तेथेही ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाची छाप पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांनी सहभाग नोंदवत आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करीत, उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, गोविंद देवगिरी महाराज, सोमनाथ पाटील, कृष्णकुमार गोयल असे अनेक मान्यवरांनी पुस्तकाचे वाचन केले.
…..
एकूण सहभाग साडेसात लाखांपेक्षा अधिक
‘शांतता.. पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण आलेल्या छायाचित्रांपैकी सुमारे दहा हजार छायाचित्र हे शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये सामूहिक वाचन करतानाचे आहेत. यातील एका छायाचित्रात साधारण शंभर विद्यार्थी किंवा नागरिक आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन करतानाचे आहे त्यामुळे या उपक्रमात एकूण पुस्तक वाचत सहभागी झालेल्यांची संख्या साडेसात लाखांपेक्षा अधिक आहे, असे राजेश पांडे यांनी सांगितले.
…
वाचन ही केवळ वैयक्तिक सवय नसून, समाजाला वैचारिक दिशा देणारी शक्ती आहे. आज ‘शांतता… पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमात हजारो नागरिकांनी पुस्तक हातात घेऊन दिलेल्या सहभागाने वाचनसंस्कृतीचे सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रत्येक वाचकाचा एक फोटो म्हणजे फक्त एक नोंद नाही, तर ज्ञान, प्रबोधन आणि विचारमूल्ये जपणाऱ्या समाजाची नांदी आहे. पुणे पुस्तक महोत्सवाद्वारे आम्ही तरुणाईत गंभीर, सशक्त आणि वैचारिक बदल घडवण्याचे स्वप्न पाहतो आणि आजच्या प्रतिसादाने ते स्वप्न अधिक दृढ झाले आहे.
- राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
….
शांतता..पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाची वैशिष्ट्ये
- एकूण फोटो ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत) : १,३५,२३८
- महिला सहभाग: ५२% (७०,३२३ )
- पुरुष सहभाग: ४८% (६४,९१५ )
- सर्वाधिक सक्रिय वयोगट: १७–२२ वर्षे
- सर्वाधिक लोकप्रिय साहित्यप्रकार: इतिहास, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य
- सर्वाधिक वाचली गेलेली पुस्तके:छत्रपती शिवाजी महाराज (चरित्र), श्यामची आई, रिच डॅड पूअर डॅड, द अल्केमिस्ट,


