पुणे, – : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास आवश्यक बहुशाखीय अभ्यासक्रमाच्या समवयाची सुरुवात एसएनडीटी महिला विद्यापीठाने आधीपासूनच केली आहे. मूल्यशिक्षण आणि कौशल्य विकासाची पायाभरणी ही नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट्ये असून, गृहविज्ञान महाविद्यालय त्यांच्या अंमलबजावणीचा वस्तूपाठ असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. नितीन करमळकर यांनी केले. एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालय आयोजित पदवी वितरण सोहळ्यात त्यांनी विद्यार्थिनी आणि पालकांशी संवाद साधला.
जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारा खंबीरपणा आणि लवचिकता यांचा समन्वय महिलांमध्ये आढळून येतो. अंतराळातील नियोजित आठवडाभराची मोहीम जवळपास नऊ महिन्यांपर्यंत लांबल्यानंतरही ती यशस्वीपणे पूर्ण केलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे अशाच महिलाशक्तीचे प्रतीक आहेत. महर्षी कर्वे यांनी महिलांना असाच आत्मविश्वास मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. म्हणूनच एसएनडीटी आवार हा केवळ एक भौगोलिक परिसर नसून अण्णांची कर्मभूमी असलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे गौरवोद्गार प्रो. करमळकर यांनी काढले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर यांनी गृहविज्ञान महाविद्यालयाने पारंपरिक शिक्षणाला उत्तम पर्याय उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. ‘व्हाय यू कान्ट’ ऐवजी ‘हाऊ यू कॅन’ अशी सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थिनींनी नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. छोट्या संधींमधूनच मोठ्या संधीची दारे खुली होतात, त्या संधी विद्यार्थिनींनी सजगपणे शोधाव्यात, असा सल्ला डॉ. नेरकर यांनी विद्यार्थिनींना दिला. गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी महाविद्यालयाने यशस्वीपणे केलेल्या वाटचालीचा गोषवारा थोडक्यात मांडला. संशोधन आणि सामाजिक जबाबदारी या पायावर कौशल्य-विकास आणि राष्ट्र उभारणीसाठी गृहविज्ञान महाविद्यालय कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यासाठी मंचावर विद्यापीठाचे आधिसभा सदस्य प्रा. सुरेंद्र निरगुडे, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. पौर्णिमा मेहता, शिक्षणशास्त्र विभागाच्या प्राचार्य डॉ. संगीता शिरोडे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुभाष पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पदवी, तसेच पदव्युत्तर विभागातील विद्यार्थीनी आणि त्यांचे पालक, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे आवारातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


