थेरगांव- :- इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज भरताना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता पुरेसी कर्मचारी व्यवस्था करण्यात आली असून स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी व इच्छुक उमेदवारांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभाग २१,२३, २४ व २७ च्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. सुप्रिया डांगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने प्रभाग क्र. २१, २३, २४ व २७ करिता कै. बापुजी बुवा सभागृह, तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय इमारत, थेरगांव निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन प्रक्रिया तसेच निवडणूक विषयक कामकाजाची माहिती देण्याकरिता राजकीय पक्षांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रभाग क्र. २१,२३, २४ व २७ चे सहाय्यक निवडणूक अधिकारी चाटे हरिदास,हेमंत देसाई ,विजय सोनवणे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया डांगे म्हणाल्या, उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याबाबत योग्स ती दक्षता घ्यावी. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्याबाबत देखील उमेदवारांनी दक्षता घ्यावी. नामनिर्देशन अर्ज सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीचे व वेळेचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून उमेदवारांनी त्या दृष्टीने आपले अर्ज सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी.
सुप्रिया डांगे यांनी नामनिर्देशन अर्ज सादर करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारासोबत केवळ २ जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे तसेच प्रचार करताना जातीय व सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. प्रचार सभा, रॅली व इतर निवडणूक विषयक परवानग्यांसाठी प्रथम येणाऱ्यासच प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती दिली.
सदर बैठकीस प्रभाग क्र. २१, २३, २४ व २७ मध्ये इच्छुक असणारे राजकिय पक्षाचे उमेदवार, अधिकृत प्रतिनिधी तसेच इच्छुक अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी अंदाजे ५० ते ५५ पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे व इच्छुक उमेदवारांच्या निवडणूक प्रक्रिया विषयक विविध शंकांचे निराकरण करण्यात आले.


