पुणे, : भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हलदीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून, आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कार, मराठी चित्रपट स्पर्धा, मराठी सिनेमा टुडे, कार्यशाळा यांची घोषणा डॉ. पटेल यांनी केली. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबिना संघवी, विश्वस्त किशोरी गद्रे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) यावेळी उपस्थित होते.
२४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १५ जानेवारीला संध्याकाळी ई-स्क्वेअर थिएटर येथे होणार असून, समारोप व पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदीर येथे होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर होत असून, त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रत्यक्ष थिएटरवर रजिस्ट्रेशन ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
यावेळी मराठी चित्रपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ज्यूरींमार्फत करण्यात येते आणि विजेत्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचे संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे ५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते.

मराठी चित्रपट स्पर्धा
१- आदिशेष – दिग्दर्शक – रमेश मोरे
२- तो, ती आणि फुजी – दिग्दर्शक – मोहित टाकळकर
३- तिघी – दिग्दर्शक – जिजीविशा काळे
४- जीव – दिग्दर्शक – रवींद्र माणिक जाधव
५- गोंधळ – दिग्दर्शक – संतोष डावखर
६- गमन – दिग्दर्शक – मनोज नाईकसाटम
७- बाप्या – दिग्दर्शक – समीर तिवारी
मराठी सिनेमा टुडे
१ – सोहळा – दिग्दर्शक – सैकत बागबान
२ – मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी – दिग्दर्शक – परेश मोकाशी
३ – माया – दिग्दर्शक – आदित्य इंगळे
४ – द्विधा – दिग्दर्शक – नीलेश भास्कर नाईक

कार्यशाळा/चर्चा सत्र
- विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान – कादंबरी ते पटकथा – तमिळ आणि मल्याळी लेखक, समीक्षक बी. जयमोहन.
- फिल्मसिटी तर्फे चर्चा सत्र.
- “मोठ्या अमेरिकन सिनेमाशी, युरोपातील सिनेमा आणि स्वतंत्र सिनेमा कसा स्पर्धा करतो – प्रादेशिक सिनेमासाठी धडे” – सर्बियन लेखक-दिग्दर्शक गोरान राडोव्हानोविक.
- “चित्रपट निर्मितीतील सर्जनशीलता आणि मर्यादा आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्याची यशस्विता” – इस्रायली दिग्दर्शक आणि प्राध्यापक डॅन वोलमन.
- “इराणी सिनेमाचा उदय” – आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धांचे ज्यूरी अलिरेझा शाहरुखी
- उद्याचे आवाज – स्पर्धा विभागातील मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांशी चर्चा.

बिस्वजित चॅटर्जी
बिस्वजित या नावाने प्रसिद्ध असणारे बिस्वजित चॅटर्जी (जन्म: १४ डिसेंबर १९३६) ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गायक आहेत. त्यांनी बंगाली आणि हिंदी चित्रपटात नायक म्हणून काम केले आहे.
त्यांच्या चित्रपटांमध्ये बीस साल बाद (१९६२), मेरे सनम (१९६५), आसरा (१९६४), ये रात फिर ना आयी (१९६६), एप्रिल फूल (१९६४), किस्मत (१९६८), दो कलियां (१९६८), इश्क पर जोर नहीं (१९७०) आणि शरारत (१९७२) यांचा समावेश आहे. आशा पारेख, वहीदा रहमान, मुमताज, माला सिन्हा आणि राजश्री यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी असायची.

फरीदा जलाल
फरीदा जलाल ( जन्म १८ मे १९४९) या प्रसिद्ध सिने आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. १९६० सालापासून त्या हिन्दी चित्रपटसृष्टीमध्ये काम करीत आहेत. फरीदा १९६९ सालच्या आराधना या चित्रपटात राजेश खन्नाच्या नायिकेच्या रूपात चमकल्या. तेव्हापासून आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये फरीदा यांनी भूमिका केल्या आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कहो ना… प्यार है, कभी खुशी कभी गम इत्यादी त्यांचे अलीकडील गाजलेले चित्रपट आहेत. त्यांना पारस, हिना, मम्मो आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, या चित्रपटांसाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
आशा काळे
आशा काळे (जन्म २३ नोव्हेंबर १९४८ गडहिंग्लज) या मराठी नाट्यचित्रपट सृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केली. कथ्थक नृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, ‘सीमेवरून परत जा’ हे, आणि पहिला चित्रपट ‘तांबडी माती’. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली.
एक रूप अनेक रंग, एखादी तरी स्मितरेषा, गहिरे रंग, गुंतता हृदय हे, घर श्रीमंताचं, देव दीनाघरी धावला, नल दमयंती इ त्यांची नाट्य कारकीर्द आहे. अर्धांगी (१९८५), अशी रंगली रात्र (१९७०), अष्ट विनायक (१९७९), आई पाहिजे (१९८८), आयत्या बिळावर नागोबा (१९७९), कुंकवाचा करंडा (१९७१), कुलस्वामिनी अंबाबाई (१९८४), गणाने घुंगरू हरवले (१९७०), चादणे शिंपीत जा (१९८२), ज्योतिबाचा नवस (१९७५), तांबडी माती (१९६९), थोरली जाऊ (१९८३), देवता (१९८३) इ त्यांचे चित्रपट आहेत.

अमर हलदीपूर
अमर हलदीपूर हे भारतीय संगीत क्षेत्रातील नामांकित संगीत दिग्दर्शक, संयोजक आणि प्रख्यात व्हायोलिन वादक आहेत. त्यांनी हिंदी, पंजाबी आणि बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये मोठे योगदान दिले आहे.
‘कर्ज’ चित्रपटातील ‘दर्द-ए-दिल’ या मोहम्मद रफींच्या गाण्यातील व्हायोलिनचा सोलो पीस हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक मानला जातो. त्यांनी लता मंगेशकर, किशोर कुमार आणि पंकज उधास यांच्यासोबत जगभरातील अनेक कॉन्सर्ट्समध्ये व्हायोलिन वादन केले आहे. त्यांनी सुमारे ६,००० हून अधिक गाण्यांचे संगीत संयोजन केले आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राजेश रोशन आणि अनु मलिक यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केले आहे. ‘शहेनशाह’, ‘मैं आझाद हूँ’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संगीत किंवा पार्श्वसंगीत दिले आहे. पंकज उधास यांच्या प्रसिद्ध गझल अल्बम्सचे संगीत संयोजन करून त्यांनी गझल प्रकार भारतात लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


